मुंबई | Mumbai
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली निधनाने अख्खा देश हळहळला. पण, अजित पवारांच्या निधनानंतर असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहे. हा अपघात होता का? अजितदादांचा विमान अपघात घातपात तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच अजितदादांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “रोहित पवार काय बोलले ते मी ऐकलेले नाही. वेगवेगळ्या माध्यमांनी आणि व्यक्तींनी ज्या शंका उपस्थित केल्या, त्या त्यांनी मांडल्या. अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेची योग्यप्रकारे चौकशी व्हावी ही मागणी चुकीची नाही. रोहित पवार यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबत मी एवढेच म्हणेन की जर कोणाच्या मनात काही शंका असेल तर त्या शंकेचे निरसन व्हायला हवे.”
ही मागणी काही चुकीची नाही
“रोहित पवारांनी पुन्हा शंका उपस्थित केल्यात, पहिल्यांदा तर अजितदादा पवार हे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं आणि वरिष्ठ नेतृत्व होतं. त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण, सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही मागणी काही चुकीची नाही, पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केलेली. आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला कल्पना देऊन, या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी, असं सांगितलं होतं, त्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करुन त्यासंदर्भातलं पत्रही मला पाठवलं आहे… आता सध्या चौकशी सुरू आहे…”
भारतातील चौकशी यंत्रणांवर कोणही अविश्वास दाखवू नये
“मुळातच मला एक गोष्ट अशी वाटते की, यासंदर्भात जी काही चौकशी सुरू आहे ती, पूर्ण न होता, आपण जर वेगवेगळे तर्क-वितर्क लावले, तर त्यासंदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. ब्लकबॉक्सही सापडलेला आहे, भारतातील चौकशी यंत्रणांवर कोणीही अविश्वास दाखवू नये, भारतातल्या चौकशी यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत, अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडून चौकशीसाठी लोक बोलावले जातात… मला असं वाटतं की, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण आपल्या देशातल्या एजन्सीवर आपण अशाप्रकारे कधी अविश्वास दाखवत नाही… या ठिकाणीही दाखवण्याचं कारण नाही… आपल्या सर्वांचेच ते लाडके नेते होते, आपल्या सर्वांनाच असं वाटतंय की, त्यांच्या अपघाताचं पूर्ण सत्य समोर आलं पाहिजे, ते सत्य निश्चितपणे बाहेर येईल, हा मला विश्वास आहे… “, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मृत्यूबाबत कुठलेही राजकारण केले जाणार नाही याबाबत काळजी घेतली पाहिजे
अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडील लोकांना तपास करण्यासाठी बोलावले जाते. त्यामुळे आपणही त्यावर विश्वास दाखवला पाहिजे. त्यामुळे शंका उपस्थित करणे चुकीचे नाही. फक्त कुठल्याही राजकीय हेतुने याचा वापर होणार नाही. आणि अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूबाबत कुठलेही राजकारण केले जाणार नाही याबाबत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे,” असे फडणवीस म्हणाले.





