दिल्ली । Delhi
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण राज्य हादरले होते.
मात्र, आता या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले असून, आमदार रोहित पवार यांनी या अपघातामागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त करत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. मुंबईनंतर बुधवारी दिल्लीत आयोजित केलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी सविस्तर प्रेझेंटेशन सादर करत तपासाच्या संथ गतीवर आणि अपघाताच्या रात्री घडलेल्या घडामोडींवर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.
रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या मृतदेहाच्या स्थितीबाबत अत्यंत संवेदनशील आणि खळबळजनक माहिती दिली. अपघातावेळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये मृतदेह असामान्यपणे फुगल्याचा दावा केला जात होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित दादांची बॉडी अत्यंत असामान्य (Abnormal) पद्धतीने फुगली होती. मुंबईतील पत्रकार परिषदेत मी ही बाब सांगितली नव्हती, पण हे गूढ वाढवणारे आहे,” असे रोहित पवार म्हणाले. या दाव्यामुळे अजित पवारांसोबत अपघातापूर्वी किंवा अपघातादरम्यान नेमके काय घडले, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
विमान अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला असला तरी, रोहित पवार यांनी मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सांगितले की, अजित पवार यांचे विमान जे पायलट चालवणार होते (कॅप्टन मदन), ते अचानक ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे सांगून सुमित कपूर यांना ऐनवेळी पाचारण करण्यात आले.
“मुंबईत सकाळी साडेसहा वाजता ट्रॅफिक कुठे असते? खरोखरच मूळ क्रू ट्रॅफिकमध्ये अडकला होता का, याचे सीसीटीव्ही तपासले जावे,” अशी मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे, सुमित कपूर यांचा इतिहास पाहता २०१० आणि २०१७ मध्ये दारू पिऊन विमान चालवल्याप्रकरणी त्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता, अशी माहितीही पवारांनी दिली.
अपघाताच्या काही क्षण आधीची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक ‘ओह शीट… ओह शीट’ असे ओरडताना ऐकू येत आहेत. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, शांभवी यांना विमान कोसळणार याचा अंदाज आला असावा. “विमानातील सर्किट ब्रेकरच्या माध्यमातून कोणीतरी विमान मुद्दाम खाली आणले असावे. विमान खाली आल्यावर जी ‘स्टॉल वॉर्निंग सिस्टीम’ सुरू व्हायला हवी होती, ती कदाचित बंद ठेवण्यात आली असावी. शांभवी पाठक यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असावा, पण काहीतरी तांत्रिक फेरफार आधीच करण्यात आला होता,” असा संशय त्यांनी व्यक्त केला.
ज्या ठिकाणी हे विमान कोसळले, तिथल्या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी विमानातून येणारा आवाज नेहमीपेक्षा वेगळा होता. विमान अत्यंत कमी उंचीवरून उडत होते. रोहित पवार यांनी या सर्व घटनाक्रमाचा संदर्भ देत असा आरोप केला की, एखाद्या नियोजित कटाप्रमाणे विमानाला खाली आणले गेले असावे. यापूर्वी एका भाजप नेत्याच्या प्रवासादरम्यानही सुमित कपूर यांच्या लँडिंगच्या पद्धतीबद्दल तक्रार करण्यात आली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले होते. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:४३ ते ८:४५ च्या दरम्यान त्यांचे ‘Learjet 45’ हे विमान बारामती धावपट्टीजवळ कोसळले. या अपघातात अजित पवारांसह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी आणि दोन्ही वैमानिक मृत्युमुखी पडले होते. रोहित पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा वेग अत्यंत मंद असल्याचे सांगत, राज्य आणि केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. या नव्या खुलाशांमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, विरोधकांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी उचलून धरली आहे.




