Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजतपोवनातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली भुमिका; म्हणाले, त्यामुळे लोकांनाही वाटते…

तपोवनातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली भुमिका; म्हणाले, त्यामुळे लोकांनाही वाटते…

मुंबई | Mumbai
पुढील वर्षी नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नाशिकमधील तपोवन परिसरातील हजारो झाडे साधुग्रामसाठी तोडली जाणार असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे. नाशिक महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयाला नाशिककरांसोबतच संपूर्ण राज्यातील निसर्गप्रेमींकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात वृक्षप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या या निर्णयाविरोधात उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांनी देखील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.

तपोवनातील या वृक्षतोडीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमादरम्यान सविस्तर भुमिका मांडली आहे. कुंभमेळ्यासाठी ही प्रस्तावित वृक्षतोड रोखणार का? राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे? याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोखठोक भूमिका मांडत ही जागा साधुग्रामची असल्याचे म्हटले आहे. तसेच या वादावर एक मध्यम मार्ग काढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीच्या वादावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “खरे तर वृक्षतोड टाळलीच पाहिजे, याबाबत काही दुमत असण्याचे कारण नाही. फक्त त्याचे राजकीयकरण करणे हे चुकीचे आहे. साधुग्रामची ही जागा कित्येक वर्षांपासून आहे. आपण त्या ठिकाणी साधुग्राम तयार करत असतो. आपण जर २०१५, २०१६ चे तेथील गुगल इमेज पाहिले तर तेथे कोणतेही झाडे नव्हते”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

“२०१७-१८ मध्ये नाशिक महापालिकेने एक प्रस्ताव आणला की त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी वृक्षरोपण केलं पाहिजे. तेव्हा राज्य सरकारची देखील ५० कोटी वृक्ष लागवडीची योजना सुरू होती. मग त्या अंतर्गत पण थोडा विचार न करता म्हणजे ती जागा आपल्याला परत १२ वर्षांनी वापरावी लागते याचा विचार न करता त्या ठिकाणी झाडे लावण्यात आले. ते झाडे आता मोठे झालेले आहेत. त्यामुळे लोकांनाही वाटते की या ठिकाणी एवढे मोठे वृक्ष आहेत आणि तुम्ही ते कसे तोडता? आता प्रशासनासमोर देखील हा प्रश्न आहे की जर ते झाडे तोडले नाही तर साधुग्राम कुठे करायचं?”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सनातन संस्कृतीमध्ये वृक्ष, पर्यावरण, नदी, याला एक विशेष महत्व
“आपण पाहिलं की उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा होतो तो १५ हजार हेक्टरमध्ये होतो आणि आपल्याला कुंभमेळा फक्त ३५० एकरमध्ये करायचा आहे. मग असं असताना जर तेथील जमीन मिळाली नाही तर मग हा कुंभमेळा कसा होईल? आपल्या सनातन संस्कृतीमध्ये वृक्ष, पर्यावरण, नदी, याला एक विशेष महत्व आहे. आपण नदीची आराधना करणारे लोक आहोत. त्यामुळे लोकांचा हा देखील समज आहे की कुंभमेळा करता आणि वृक्ष कसे तोडता? लोकांना असे वाटणे हे योग्य आहे. त्यामुळे या वादामध्ये आपल्याला एक मधला मार्ग काढावा लागेल.

राजकारण करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही
ती जागा देखील आपल्याला वाचवता येईल आणि जेवढे वृक्ष वाचवता येतील तेवढे वाचवले पाहिजेत. काही वृक्ष ट्रान्सप्लांट करण्याची गरज असेल तर ते देखील केले पाहिजे. मी प्रशासनाची जी काही चर्चा केली त्यानुसार, प्रशासनाचे असे मत आहे की कुंभमेळाही झाला पाहिजे आणि आपल्याला झाडेही जास्तीत जास्त कशा पद्धतीने वाचवता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे. पण यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Kopargaon : समृद्धी महामार्गावर डिझेल तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon समृद्धी महामार्गावरून होणार्‍या अवैध इंधन तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. विविध पेट्रोल पंपांवरून चोरून साठवलेले तब्बल 34...