देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेस काल दुपारी भेट दिली. यावेळी कामांचा आढावा घेतला व पालिकेने राबविलेल्या
विविध उपक्रमांची पाहणी करून पालिकेने केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी दिली.
जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी प्रथम देवळाली प्रवरा शहरामध्ये व परिसरात झालेल्या जलसंधारणाच्या व ओढे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पालिकेने राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. नगर परिषदेच्या कार्यालयात विविध विकास कामांचा आढावा घेतला व रखडलेल्या अनेक कामांच्या त्रुटीवर पर्याय काढून त्या कामाचा मंजुरी देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली.
पालिकेने राबविलेल्या अनेक योजनांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्याबरोबर शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर कदम, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, गटनेते सचिन ढुस, नगरसेवक बाळासाहेब खुरुद, मुख्याधिकारी अजित निकत व सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर कदम यांनी जिल्हाधिकारी भोसले यांचा सन्मान केला.
नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी भोसले यांचा सन्मान केला. यावेळी भोसले यांच्यासमवेत उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार एफ. आर. शेख, देवळाली प्रवराचे तलाठी साळवे आदी उपस्थित होते.