अहिल्यानगर |प्रतिनिधी\ Ahilyanagar
शहरात विविध महापुरूष व राष्ट्रपुरूषांचे 25 पुतळे आहेत. या पुतळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजाला मिळते. या पुतळ्यांच्या परिसरात व पुतळ्यांची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे. उद्यान विभागाने याबाबत गांभीर्याने उपाययोजना करून सर्व पुतळ्यांची नियमित स्वच्छता करावी, परिसरातही दैनंदिन साफसफाई होईल, याची दक्षता घ्यावी, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्ताने आयुक्त डांगे यांनी शहरातील राष्ट्रपुरूष व महापुरूषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व देखभालीचा आढावा घेतला. शहरात 25 महापुरूषांचे पुतळे आहेत. त्यांच्या परिसरात अथवा पुतळ्याची स्वच्छता नियमित झालीच पाहिजे. उद्यान विभागाने यासाठी कर्मचारी नियुक्त केला आहे. या कर्मचार्याने दररोज पुतळ्यांच्या परिसरात पाहणी करावी. पुतळ्याची स्वच्छता करावी. या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. त्यामुळे उद्यान विभागाने याबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी दिले आहेत.
दरम्यान, शहरात स्वच्छता अभियान सुरू आहे. शहरात कुठेही कचरा साचणार नाही, याची दक्षता स्वच्छता निरीक्षकांनी घ्यावी. महापुरूषांच्या पुतळ्यांच्या परिसरातही स्वच्छता झाली की नाही, याची नियमित तपासणी करावी. शहरात अस्वच्छता आढळल्यास, पुतळ्यांच्या परिसरात अस्वच्छता आढळल्यास संबंधित कर्मचार्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.