संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर तालुक्यात बुधवारी( ता.13) सायंकाळी वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले. अचानक आलेल्या या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोहारे येथे वीज पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर डिग्रस येथे घराची भिंत अंगावर कोसळल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. तसेच रणखांब परिसरात विज पडून पाच शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
लोहारे येथे सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली होती. परिसरात विजांचा कडकडाट सुरू असतानाच लताबाई कैलास सोनवणे (वय 42) यांच्या अंगावर अचानक वीज पडली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत त्यांना उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, डिग्रस येथेही वादळी वार्यामुळे मोठे नुकसान झाले. महादू माळी (वय 70) यांच्या घराची भिंत अचानक कोसळून ती त्यांच्या अंगावर पडली.
या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली; मात्र त्यांचाही मृत्यू झाला. अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वार्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला होता. रणखांब परिसरातही बुधवारी सायंकाळी जोरदार वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. रणखांब शिवारातील बारवेवस्ती परिसरात सुधाकर पांडुरंग मन्सूक व सुभाष लहानु गुळवे हे दोघे शेतकरी आपल्या शेळ्या चारत होते. त्याचवेळी अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि वीज पडून सुधाकर मन्सूक यांच्या चार तर सुभाष गुळवे यांच्या एका अशा एकूण पाच शेळ्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सरपंच बाबाजी गुळवे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्याची मागणी केली. त्यानंतर महसूल विभागालाही घटनेची माहिती देण्यात आली. या वादळी वार्यामुळे अनेक शेतकर्यांच्या शेततळ्यांचे कागद उडून गेले असून घरांचे पत्रेही उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पिंपरणे, शिबलापूर, आश्वी, शेडगाव, मालुंजे आणि कनोली परिसरात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकरी व नागरिकांची मोठी धावपळ उडवली.
वादळामुळे पिंपरणे ते शिबलापूर रस्त्यालगतची अनेक मोठी झाडे उन्मळून थेट रस्त्यावर कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळची वेळ असल्याने कामावरून घरी परतणारे नागरिक, शेतकरी आणि वाहनचालक रस्त्यात अडकून पडले होते.चंद्रभान वामन मुंतोडे यांच्या दुकानावर मोठे लिंबाचेझाड कोसळल्याने दुकानाचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वादळी वार्याचा सर्वाधिक फटका शेतकर्यांना बसला आहे. अन्वर शेख यांनी कांदा साठवण्यासाठी उभारलेली कांदा शेड वार्याच्या तडाख्यात पूर्णपणे कोसळली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेक शेतकर्यांच्या शेतीमालाचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून परिसरात अक्षरशः जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. वादळी वार्याच्या तडाख्याने एका शेतकर्याचे संपूर्ण घर कोसळल्याची घटना घडली असून काही घरांचे छप्पर व पत्रे उडून गेल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 100 ते 200 झाडे या वादळात उन्मळून पडल्याचे सांगितले जात आहे. अचानक आलेल्या या अवकाळी संकटामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




