Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील 'या' विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीसाठी समिती गठीत

राज्यातील ‘या’ विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीसाठी समिती गठीत

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

कुलगुरू निवडीचे सर्वाधिकार प्राप्त झाल्यानंतर राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी (Governor and Chancellor Bhagat Singh Koshyari)यांनी गुरुवारी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समिती गठीत करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन आणि राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये हे या निवड समितीचे सदस्य असतील.

तत्कालीन आघाडी सरकारने कुलगुरू निवडीच्या राज्यपालांना असलेल्या अधिकारांना कात्री लावली होती. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करून सरकारने उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांची प्रकुलपती म्हणून नियुक्ती केली होती. कुलगुरू निवडीसाठी प्रकुलपती मार्फत राज्यपालांना तीन नावांची शिफारस करण्याची सुधारणा आघाडी सरकारने केली होती. मात्र, मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना प्रकुलपती म्हणून देण्यात आलेले अधिकार मागे घेण्यात आले होते. यापार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्यातील तीन विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी समिती गठीत केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी कर्नाटक उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती शुभ्र कमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर आणि शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर हे या समितीचे सदस्य असतील.

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप कुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. वेरावळ गुजरात येथील श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू गोपबंधू मिश्र आणि राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे या समितीचे अन्य सदस्य असतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या