मुंबई | Mumbai
डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशनच्या बाजूने मतदान करणार असल्याची चर्चा आहे. डिलिमिटेशनवरून इंडिया आघाडीतही फूट पडल्याचं बोललं जात आहे. शरद पवार यांच्या पक्षाने डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन पक्षात फूट पडू शकते, असे कारण काँग्रेस नेतृत्त्वाला कळवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सोमवारी लोकसभेत डिलिमिटेशन विधेयक मांडल्यावर शरद पवारांची राष्ट्रवादी त्याच्या बाजूने मतदान करणार, हे जवळपास स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत जहाल भाषेत टीका केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने शरद पवारांना राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली तर काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांचा इतिहास खंजिर खुपसण्याचा असल्याचे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार साहेब यांचे 86 वय असून त्यांनी त्यांचे आयुष्य पुरोगामा विचारांचे राहिले आहे. त्यामुळे ते जातीयवादी, धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करून भाजपसोबत जातील असे वाटत नव्हते. पम त्यांनी पाठिंबा जाहीर करून त्यांचा पक्ष सत्तेसाठी बनल्याचे दाखवून दिले आहे, अशी खरपूस टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार काय म्हणाले?
शरद पवार साहेब ८६ वर्षांचे आहेत. संपूर्ण आयुष्य त्यांनी पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला. असा नेता जातीयवादी, धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करुन त्यांच्यासोबत जाईल, असे कधीच वाटले नव्हते. पण पवारांचा इतिहासा हा खंजीर खुपसण्याचा आहे, हे महाराष्ट्रातील लोकांन माहिती आहे. अनेकदा तशी परिस्थिती आली तेव्हा हे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेसाठीच बनला आहे. सत्तेशिवाय जगणं या पक्षाला मान्यच नाही, त्यांना कुठलाही विचार नाही, हे सिद्ध झाले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
गद्दारांची मांदियाळी असताना…; डिलिमीटेशनच्या पाठिंब्यावरुन काँग्रेसचा शरद पवार, सुळेंना टोला
आम्ही सगळ्यांनी मिळून शरद पवार यांना ८५ व्या वर्षी राज्यसभेवर पाठवले
आम्ही सगळ्यांनी मिळून शरद पवार यांना ८५ व्या वर्षी राज्यसभेवर पाठवले. त्यांच्या रुपाने राज्यसभेत फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार राहिला पाहिजे, हे त्यामागील कारण होते. पण आता हा विचार संपवण्याचे काम शरद पवार यांनीच केले आहे. डिलिमिटेशनंतर देशात जी परिस्थिती निर्माण होईल, लोकशाही संपवण्याच्या ज्यांचा वाटा आहे, त्यांची यादी निघेल, त्यामध्ये शरद पवार यांचे नाव असेल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
10 आमदारांच्या बळावर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपद मागणे हे हास्यास्पद आहे
डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यावर संविधान संपेल, लोकशाही संपेल, उद्या देशात निवडणुकाच होणार नाहीत. डिलिमिटेशनमुळे देशात हुकुमशाही येईल. शरद पवार यांच्या पक्षाचा निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. 10 आमदारांच्या बळावर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपद मागणे हे हास्यास्पद आहे. भाजपने शिंदे गटाकडे 60 आमदार असताना त्यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही. पण सुप्रिया सुळे डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असतील म्हणून त्यांना भाजप मुख्यमंत्री बनवणार असेल तर आनंद आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
दोघेही बापलेक निर्णय घेतात, भाजपला साथ देण्याचा निर्णय घरात मिळून घेतला
शरद पवार हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक,सामाजिक विचाराला पायदळी तुडवण्याचं पाऊल उचलणार असतील, तर ते त्यांना लखलाभ आहे. पक्ष फुटणार म्हणून पाठिंबा दिला, यामध्ये कितीही तथ्य आहे माहिती नाही. सुप्रिया सुळे यांचा सुरुवातीपासूनचा प्रवास पाहता त्या सत्तेत जातील, असे वाटत होते. या लोकांना विचार नाही. हे केवळ सत्तेसाठी जन्माला आले आहेत, सत्ता घेऊन मरायचं एवढंच यांच्या डोक्यात आहे. दोघेही बापलेक निर्णय़ घेतात, भाजपला साथ देण्याचा निर्णय घरात मिळून घेतला आहे, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.



