मुंबई | Mumbai
देशाच्या लोकशाहीसाठी घातक असणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार) घेतला असेल तर यापुढे त्यांना फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही. मोदी-शाहांचे हात बळकट करणे हा महाराष्ट्रद्रोह आहे. लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या विधेयकाला जर शरद पवार पाठिंबा देणार असतील तर आम्ही शांत बसणार नाही, अशा संतप्त भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.
काल (शुक्रवारी, ता २७) पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या डिलिमिटेशन बिलाला आमचा पाठिंबा आहे अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली. अशातच इंडिया आघाडीच्या बैठकीला एकही खासदार शरद पवारांच्या पक्षाचा जाणार नसल्याचं समोर आलं आहे. एकीकडे इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने डिलिमिटेशनला जाहीर विरोध केला आहे. परंतु शरद पवारांची राष्ट्रवादी याबाबत संभ्रमावस्थेत असल्याचं चित्र आहे. पण सुप्रिया सुळे यांच्यानंतर एकही खासदार या बैठकीला उपस्थित राहणार नाही. इंडिया आघाडीत उभी फूट पडल्याचे यावरून पुढे आले. तर राष्ट्रवादीच्या या भूमिकेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांसह पक्षावर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेमुळे शिवसेना आणि काँग्रेस संतप्त झाली आहे. राष्ट्रवादीकडे केवळ १० आमदार होते, असे असताना आम्ही आमच्या मतांच्या जोरावर शरद पवार यांना खासदार करून राज्यसभेत पाठवले, तेच पवार आज मोदी-शाहांना मदत करायला निघालेत, असा हल्ला काँग्रेसने चढवला. तर इकडे शिवसेनेने देखील पवारांना इशारा दिला आहे. पवारांची एवढी काय मजबुरी आहे की त्यांनी लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलीये. असे असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असे राऊत म्हणाले.
मोदी-शाहांचे हात बळकट करणे हा महाराष्ट्रद्रोह आहे
शरद पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्यास आम्ही सहन करणार नाही. मोदी-शाहांचे हात बळकट करणे हा महाराष्ट्रद्रोह आहे. हे विधेयक लोकशाहीचा गळा आवळणारं आहे. असे असतानाही त्यांनी पाठिंब्याची भूमिका घेतली असेल तर पवारांची राष्ट्रवादी कोणत्या तोंडाने इंडियाच्या बैठकीला जाणार? पवारांच्या सहकाऱ्यांनी माती खाल्ली, सत्तेत जाण्याची घाई काहींना झालीये, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
यापुढे आता त्यांना महापुरूषांचे नाव घेण्याचा अधिकार नाही
पवारांचा पक्ष नेहमी फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेतो. यापुढे आता त्यांना महापुरूषांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. सत्तेत जाण्याआधी शरद पवार यांच्या पक्षाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची माफी मागितली पाहिजे. कारण त्यांनी भाजपला अंगावर पक्षासाठी तुरूंगवास भोगला, असे राऊत म्हणाले.
कोणताही विजय हा मेरिटवर किंवा लोकांनी मतदान केलं म्हणून मिळवलेला नाही
लोकशाहीचा गळा आवळणारं, लोकशाही खतम करणारं विधेयक आहे. 543 खासदारांच्या जागी 860 खासदार आणायचे आणि त्या 860 मतदारसंघाची पुनर्रचना आपल्या मर्जीप्रमाणे करून या देशातल्या जनतेच्या हातातली सत्ता खेचून घ्यायची कायमस्वरूपी आपल्या हातामध्ये अखंड सत्ता. हे भारतीय जनता पक्षाचं हा एक कारस्थान आहे. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने जे विजय मिळवले, यापैकी कोणताही विजय हा मेरिटवर किंवा लोकांनी मतदान केलं म्हणून मिळवलेला नाही. 2014 साली त्यांनी जनतेची फसवणूक करून खोटं बोलून विजय मिळवला.
2029 च्या विजयासाठी जे मिळावं म्हणून डीलिमिटेशन…आम्ही सांगू ते मतदारसंघ
15-15 लाख रुपये आम्ही देऊ,अमुक करू, तमुक करू. त्यानंतर त्यांनी ईव्हीएमचा घोटाळा केला. त्यानंतर त्यांनी व्होट चोरी केली. व्होट चोरी, अशा प्रकारची कृत्य केली. विरोधी पक्षांना हे सगळं एक्सपोज केल्यावरती आता त्यांनी 2029 च्या विजयासाठी जे मिळावं म्हणून डीलिमिटेशन…आम्ही सांगू ते मतदारसंघ, आम्ही सांगू त्या पद्धतीने मतदारसंघ निर्माण केले जातील आणि 860 खासदार हे संसदेमध्ये आणले जातील. हे देशाच्या सुरक्षेला, देशाच्या एकंदरीतच रचनेला, फेडरल सिस्टीमला अत्यंत धोकादायक असा प्रकार आहे.



