मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान (Voting) येत्या सोमवारी म्हणजेच (दि.२० मे) रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जनतेच्या नजरा महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आज होणाऱ्या सभांकडे लागले आहे. तसेच आज महाविकास आघाडीची महाराष्ट्रात (Maharashtra)अखेरच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता मुंबईमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
यावेळी बोलताना कॉंग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, पंतप्रधान मोदी जिकडे जातात तिकडे फूट पाडण्याचे काम करत आहेत. चुकीचा विचार लोकांसमोर मांडून नागरिकांना भडकावण्याचे काम करत आहेत. मी ५३ वर्षांपासून राजकारणात आहे. परंतु, अशा पद्धतीचे राजकारण यापूर्वी कधीच बघितले नव्हते. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकी देणे, प्रादेशिक पक्ष हिसकावून घेणे, असे प्रकार सुरु आहे. सगळ्या यंत्रणांना हाताशी धरुन भाजप कुरापती करत आहे. परंतु आता लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली असून त्यांची नाराजी मतपेटीतून पुढे येणार आहे, असे खर्गे यांनी सांगितले.
पुढे बोलतांना खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) हवा असून आम्ही ४८ पैकी ४६ जागा जिंकू, असा मला विश्वास आहे. मुंबईमध्ये मागील दोन वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अनेक राज्यांमध्ये मोडतोड करुन सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळत आहे. परंतु या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश मिळणार आहे. मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी आरबीआयचे कार्यालय आहे. परंतु, जेव्हापासून मोदी आले आहेत तेव्हापासून या शहराला खाली खेचण्याचे काम त्यांनी केले आहे, असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले.