मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही अष्टपैलू आहे, असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. तिच्या अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. २०१९ मध्ये फत्तेशिकस्त या चित्रपटात ती केसर या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली, शिवकालीन भाषा आणि तलवार बाजीचं प्रशिक्षण देखील घेतलं. फत्तेशिकस्त मधली ही केसर आता झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्या निमित्ताने मृण्मयीसोबत साधलेला हा खास संवाद
१. या ऐतिहासीक चित्रपटातील भूमिकेसाठी जेव्हा तुम्हाला विचारण्यात आलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती?
– फर्जंद नंतर लगेचच दिग्पालने फत्तेशिकस्तची जुळवा जुळव सुरु केली. मला माहित होतं की केसरची भूमिका मला परत करायला मिळणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक होते. त्याने मला सांगितलं होतं कि फत्तेशिकस्त मधील केसर थोडी वेगळी असणार आहे. आणि त्यामुळे उत्सुकता अजुनच वाढली होती.
२. तुमच्या चित्रपटातील भूमिकेसाठी तुम्ही कशी तयारी केली?
– फत्तेशिकस्त मधील केसर आणखी नवखी होती. तिने एखादी चूक जर केली तर त्याची किंमत तिला एकटीलाच नाही तर सर्वानाच भोगावी लागणार होती. अशा परिस्थितीमध्ये बहिर्जी नाईकांनी तिला सहभागी करून घेतल होतं. फत्तेशिकस्तमधील केसरची तयारी तशी फर्जंद पासूनच सुरु झाली होती. मी संहिता वाचल्यावर त्या भूमिकेची गाभा मला कळाला.
३. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एखादा अविस्मरणीय किस्सा सांगा
– या चित्रपटातील एक सीनच माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. जेव्हा केसर पकडली जाईल कि काय अशी भीती निर्माण होते आणि भटारखान्यात नामदारखान जेव्हा केसरचा गळा धरतो तेव्हा मला वेग वेगळे हावभाव एकाच वेळेस दयायचे होते. हा अवघड सीन आम्ही शूट केला आणि तो पहिल्याच टेक मध्ये व्यवस्थित शूट झाला. दिग्पाल आणि माझा अत्यंत आवडीचा हा प्रसंग होता.
४. चित्रपट रिलीज झाल्यानंतर मिळालेली सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट .?
– बहिर्जी नाईक आणि केसर यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या असं बऱ्याच लोकांकडून सांगण्यात आलं. आणि मी आधी सांगितलेला सीन त्याचं कौतुक खूप लोकांनी केलं.
५. तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल ?
महाराष्ट्राला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. त्यातच छत्रपती शिवरायांचा इतिहास हा प्रत्येक नागरिकांना नवी उमेद देणारा आहे. फत्तेशिकस्त च्या माध्यमातून काही अंशी तो प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून बघावा.