सार्वमत
मुंबई – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र झटत असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील आणखी एकाचा रविवारी मृत्यू झाला. करोनामुळे बळी पडलेल्या पोलिसांची संख्या दोन झाली आहे. मुंबई पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल संदीप सुर्वे (वय – 52) यांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी ट्विट करत या करोना योद्ध्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई पोलीस दलातील कार्यरत पोलिस हवालदाराचे करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सर्व मुंबई पोलीस परिवार सहभागी असल्याचं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं. करोनामुळे मुंबई पोलिस दलातील हा दुसरा मृत्यू आहे. राज्य पोलीस मुख्यालयाच्या आकडेवारीनुसार शनिवारी करोना बाधित पोलिसांची संख्या शंभरी पार गेल्याचे सांगण्यात आले.
या आधी शनिवारी मुंबईतील कोलावा पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर (वय – 57) यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे करोनाच्या संसर्गाला बळी पडणार्या राज्यातील पोलिसांची संख्या आता दोन झाली आहे.
महाराष्ट्र पोलिस दलातील 96 पोलिसांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यात 15 पोलिस अधिकार्यांचाही समावेश आहे. करोनाच्या संसर्गाने आता एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्यामुळे पोलिस दल हादरून गेले आहे.
दरम्यान दोन्ही पोलिस कर्मचार्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.




