Monday, May 6, 2024
Homeनगरदरवाढीच्या अपेक्षेने कापूस साठवणुकीवर भर

दरवाढीच्या अपेक्षेने कापूस साठवणुकीवर भर

शेवगाव | Shevgav

कापसाच्या दरात वाढ होईल व त्यातून कापूस उत्पादकांना चांगले दिवस येतील या आशेने बहुतेक कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी आपला कापूस घरातच साठवुन ठेवला आहे. मात्र सध्या कापसाचे भाव आठ हजाराच्या आसपास असल्याने व घरात साठवलेला कापूस काळवंडत चालला आहे. भरीसभर कापसाच्या वजनात दिवसागणिक होणारी घट, भावातील घसरण यामुळे कापूस उत्पादन शेतकर्‍यांचे अर्थकारण संकटात सापडले आहे.

- Advertisement -

पूवी ज्वारी कोठार म्हणून जिल्ह्यासह राज्यात ओळख असलेल्या शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचा कल नगदी पीक असलेल्या कापसाकडे वाढला आहे. गेल्या काही वर्षापासून कापसाच्या उत्पादनात शेवगाव तालुक्याने जिल्ह्यासह राज्यात आघाडी घेतली आहे. शेवगाव तालुक्यात उत्पादित होणारा कापूस हा लांब धाग्याचा असल्याने या परिसरातील कापसाला राज्यासह नजीकच्या मध्यप्रदेश गुजरात आदी राज्यांतुन वाढती मागणी आहे.

मध्यप्रदेश गुजरात या राज्यातील कापूस खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनी शेवगाव व परिसरात आपल्या कापूस मील उभारल्या असून त्यातून परिसरातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत आहे. शेवगाव बाजार पेठेतील उलाढालीत समाधानकारक वाढ झाली आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून कापसाची समाधान कारक आवक होत नसल्याने खाजगी कापूस मिल चालकांचे धाबे दणाणले आहे.

यंदाच्या कापूस खरेदी हंगामाच्या सुरुवातीला असलेले कापसाचे दहा हजाराच्या आसपास असलेले भाव सध्या 7 हजार 800 पासुन ते 8 हजारांपर्यंत खाली आल्याने आणखी भाव वाढतील या आशेने शेतकरी आपला कापूस घरात साठवून ठेवत आहेत. परंतु वजनात होणारी घट व रंग काळवंडत असल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. हा कापूस उत्पादक शेतकरी दररोजच्या कापूस भावाकडे डोळे लावून बसलेला आहे. मात्र सध्या तरी त्यांच्या पदरात निराशाच पडत चालल्याने तालुक्यासह परिसरातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

45 हजार हेक्टर कापसाचे क्षेत्र

तालुक्यातील खरीपाचे एकूण क्षेत्र 60 हजार हेक्टरच्या आसपास असून गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे 45 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यात सतत दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करणार्‍या तालुक्यातील बोधेगाव, चापडगाव आदी मंडळात विक्रमी कापसाची लागवड झालेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या