मुंबई | Mumbai
बंडखोरी आणि राजकीय कुरघोडीमुळे गाजलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी (Vote Counting) आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Eelction) पसंतीक्रमानुसार होत असल्याने मतमोजणीच्या अनेक फेऱ्या होतील.
त्यामुळे उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या (Teachers’ and Graduates Constituencies) मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी संबंधित विभागीय आयुक्त हे निवडणूक अधिकारी आहेत. त्यांच्या देखरेखीत मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या पुणे आणि अमरावती शिक्षक तसेच पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी गेल्या आठवड्यात शुक्रवार (दि.२३ ऑक्टोबर) रोजी सरासरी ७२ टक्के मतदान झाले होते. यापैकी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक ९१ टक्के तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ५८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर नागपूर पदवीधर मतदारसंघात ६४ टक्के, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात ६२ टक्के तर पुणे शिक्षक मतदारसंघात ८५ टक्के मतदान झाले आहे.
पुण्यात पेन-कागदावरून वाद अन् सील तुटलेल्या मतपेट्यांवर आक्षेप
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर पोलिसांच्या (Police) भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला. केंद्राच्या आत उमेदवारांच्या प्रतिनिधींना पेन आणि कागद घेऊन जाण्यास पोलिसांनी स्पष्ट मज्जाव केला. यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांचे वडील प्रभाकर देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलीस आतमध्ये पेन आणि कागद नेऊ देत नसतील, तर प्रतिनिधींनी मतमोजणीची नोंद कशी ठेवायची? पोलीस सहकार्य करत नाहीत, असा आरोप करत प्रभाकर देशमुख यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून, यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी मतपेट्या दाखवण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही मतपेट्यांची सील तुटल्याचे निदर्शनास आले. उमेदवार प्रतिनिधींनी यावर कडक हरकत घेत, सील नसलेल्या मतपेट्या बाजूला ठेवून आधी सुरक्षित मतपेट्यांची मोजणी करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून या प्रकरणाचे व्हिडिओ दाखवले जातील, असे स्पष्ट करण्यात आले असले तरी काही काळ केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नागपूरात अवैध मतांचा टक्का वाढण्याची शक्यता
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण ६४.७६% मतदान झाले असून (२,५५,६०३ पैकी १,६५,५४१ मतदार) ३८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे ८४ हजार मतांची पहिली फेरी आणि पोस्टल मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, २३८ पोस्टल मतांपैकी ३४ मते अवैध तर २०४ मते वैध ठरली आहेत. मात्र, प्रत्यक्ष मतपत्रिकांच्या पाहणीदरम्यान अनेक मतदारांनी पसंतीक्रम १, २ असे लिहिण्याऐवजी उमेदवाराच्या नावापुढे टिकमार्क (✔️) केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये अवैध मतांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमरावतीमध्ये गठ्ठे बांधण्याची प्रक्रिया सुरू
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत २५- २५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या फेरीचे काम पूर्ण झाले असून, तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. एकूण ६ फेऱ्यांमध्ये मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे गठ्ठे लावले जातील आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.




