अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना बाधितांची घटती संख्या पाहता महापालिकेने आनंद लॉन्स पाठोपाठ आता शासकीय तंत्रनिकेतनमधील कोवीड सेंटर बंद केले आहे. आता नटराज, जैन पितळे बोर्डिग, बूथ आणि कर्मयोगी ही सेंटर सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना नगर शहरात बाधितांची संख्या मोठी होती. त्यामुळे महापालिकेने शहरात सामाजिक संघटनांच्या विद्यमाने आणि स्वत: काही अशी कोवीड सेंटर सुरू केले. कालातंरान बाधितांची संख्या घटली. बाधितांची संख्या जास्त असली तरी त्यांना लक्षणे नाहीत, त्यामुळे ही लोक घरीच फॅमिली डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत. गत महिन्यात महापालिकेने सावेडीतील आनंद लॉन्स येथील कोवीड सेंटर बंद केले. आता काल रविवारी शासकीय तंत्रनिकेतन येथील कोवीड सेंटर बंद केले. गत पाच दिवसांपासून या सेंटरमध्ये नव्या बाधितांना प्रवेश देणे बंद केले होते. काल 8 पेशंटला डिस्चार्ज दिल्यानंतर ते बंद करण्यात आले.
भाजप व महापालिका संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या नटराज येथे बाधितांवर उपचार सुरू आहेत. जैन-पितळे बोर्डिंग आणि बूथ हॉस्पिलमध्ये बाधितांवर उपचार करण्याची सुविधा आहे. तेथील बेडची संख्या आणि प्रत्यक्षात बाधित प्रमाण पाहता शासकीय तंत्रनिकेतन कोवीड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.




