Tuesday, June 16, 2026
HomeनगरRahata : गोठ्यात वीजप्रवाह उतरल्याने 9 दुभत्या गाईंचा मृत्यु

Rahata : गोठ्यात वीजप्रवाह उतरल्याने 9 दुभत्या गाईंचा मृत्यु

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे सोमवारी रात्री निसर्गाच्या कोपाने आणि वीज यंत्रणेच्या तांत्रिक बिघाडाने एका शेतकरी कुटुंबाचा आधारच हिरावला आहे. वादळी पावसामुळे उच्च दाबाच्या विद्युत तारा तुटून थेट गोठ्यावर पडल्याने लोखंडी शेडमध्ये वीजप्रवाह उतरला. या भीषण घटनेत शेतकरी संजय भास्कर घोलप यांच्या गोठ्यातील तब्बल नऊ गाईंचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेची दखल घेत राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

पाथरे बुद्रुक येथील प्रवरानगर रस्त्यालगत संजय घोलप व आदित्य घोलप यांचा जनावरांचा गोठा आहे. सोमवारी सायंकाळी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सुरक्षेसाठी खंडित केलेला वीजपुरवठा रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा सुरू झाला. मात्र वीज सुरू होताच एमएसईबीच्या लाईनमध्ये मोठे स्पार्किंग होऊन विद्युत तारा तुटल्या आणि त्या थेट लोखंडी पत्र्याच्या शेडवर कोसळल्या. काही क्षणांतच संपूर्ण गोठ्यात करंट पसरला. गाईंच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबाने बाहेर धाव घेतली. सुरुवातीला बिबट्याचा हल्ला वाटला, मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच ट्रान्सफॉर्मरवरील पुरवठा बंद केल्याने 4 ते 5 जनावरांचे प्राण वाचवण्यात यश आले.

या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना तातडीने पंचनामे करून मदतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मंगळवारी सकाळी राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे, पशुधन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. संपत तांबे, एमएसईबीचे अभियंता दिलीप गाडे, तलाठी सलीम इनामदार आणि सरपंच उमेश घोलप यांच्यासह विविध विभागांच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत जनावरांचे जागेवरच शवविच्छेदन केले. या अस्मानी संकटामुळे घोलप कुटुंबाचे कंबरडे मोडले असून, दुभते पशुधन नष्ट झाल्याने त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. पाथरे बुद्रुक ग्रामस्थांनी आणि बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू यांनी शासनाकडे या पीडित शेतकर्‍याला जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. वीज यंत्रणेच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शेतकर्‍यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...