शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
पतसंस्थेच्या राहाता शाखेतील बहुचर्चित बँक खाते गैरव्यवहार प्रकरणात शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई करत शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर यास मंगळवारी रात्री अटक केली आहे. या कारवाईमुळे बँक वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. बुधवारी संशयित आरोपी बनकर याला राहाता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू अशोक खरात याने खातेदारांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता तब्बल 108 व्यक्तींच्या नावावर बँक खाती उघडली होती. या सर्व खात्यांवर नॉमिनी (वारसदार) म्हणून स्वतःचे नाव लावून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचा आरोप खातेदारांनी केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्य आरोपी अशोक खरात याला अटक केली असून तो सध्या 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
एकाच दिवशी 108 खाती उघडून गैरव्यवहारास खतपाणी घालणारे शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना मंगळवारी रात्री 10 वाजता शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. शाखा व्यवस्थापकाने नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून व दबावाखाली एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाती उघडली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दरम्यान, तालुक्यातील इतर काही बँकांमध्येही अशाच प्रकारे बोगस खाती उघडण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याने इतर बँक व्यवस्थापकांचेही धाबे दणाणले आहेत.




