आशिया चषक २०२५ चा भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेटचा सामना आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळण्यात आला. भारतीय संघाने ५ गडी बाद २०२ धावा करत श्रीलंकेच्या संघाला २०३ धावांचे आव्हान दिले. २०३ धावांच्या आव्हानापुढे श्रीलंकेच्या संघाने ५ गडी बाद २०२ धावा केल्या. सामना बरोबरीत आल्याने सुपर ओव्हर खेळविण्यात आल्या. सुपरओव्हर मध्ये श्रीलंकेच्या संघाने दोन गडी बाद दोन धावा केल्या तर भारतीय संघाच्या सूर्यकुमार यादवने १ चेंडूत ३ धावा करत भारतीय संघ विजयी झाला. भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने ३१ चेंडूत ६१ धावा करत तर तिलक वर्माने ३४ चेंडूत ४९ नाबाद धावा करत धडाकेबाज फलंदाजी करत भारतीय संघासाठी मोठी कामगिरी केली. तर श्रीलंकेच्या संघाने भारतीय संघाला कडवी झुंज देत श्रीलंकेच्या पथुम निस्सांकाने ५८ चेंडूत १०७ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा व शुभमन गिल सलामीला फलंदाजीस आले. भारतीय संघाच्या सलामीला आलेल्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजीने सुरवात केली. सामन्याच्या दुसऱ्या षटकात महेश थीक्सानाने शुभमन गिलला ४ धावांवर झेल बाद केले.७व्या षटकात वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर सुर्यकुमार यादव १२ धावांवर पायचीत झाला.तर ९ व्या षटकात धुवाधार फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा सी असलंकाच्या गोलंदाजीवर के मेंडीस कडून झेल बाद झाला. अभिषेक शर्माने ३१ चेंडूत २ षट्कार व ७ चौकार लगावत एकूण ६१ धावा केल्या. १० व्या षटका अखेर भारतीय संघाच्या ३ गडी बाद १०० धावा केल्या.
अभिषेक शर्मा बाद झाल्या नंतर तिलक वर्मा व संजू सॅमसनच्या जोडीने फलंदाजीचे शानदार प्रदर्शन केले. १६ व्या षटकात डी. शनाकच्या गोलंदाजीवर सी.असलंकाने संजू सॅमसनला झेल बाद केले.संजू सॅमसनने २३ चेंडूत ३९ धावा केल्या.१७ व्या षटकात हार्दिक पंड्या डी.चामिराकडून २ धावसंख्येवर झेल बाद झाला. तिलक वर्माने ३४ चेंडूत नाबाद ४९ धावा तर अक्षर पटेलने १५ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. २० व्या षटका अखेर भारतीय संघाने ५ गडी बाद २०२ धावा केल्या.
२०३ धावांचे आव्हान पार करताना श्रीलंकेच्या संघाकडून प्रथम पथुम निस्सांका व कुसल मेंडिस प्रथम फलंदाजीस आले. सामन्याच्या पहिल्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने कुसल मेंडिसला शून्य धावस्न्ख्येव्र झेल बाद करत तंबूत परत पाठवत श्रीलंकेच्या संघास पहिला धक्का दिला. सामन्याच्या १३व्य षटकात वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने कुसल परेराला स्टंप आउट करत श्रीलंकेच्या संघास दुसरा धक्का दिला. कुसल परेराने ३२ चेंडूत ५८ धावा केल्या. १६ व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने सी असलंकाला ५ धावांवर झेल बाद केले. १७ व्या षटकात अर्शदीपसिंगच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने कामिंदू मेंडीसला ३ धावांवर झेल बाद केले.अखेरच्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर वरून चक्रवर्तीने पथुम निस्सांकाला झेल बाद करत श्रीलंकेच्या संघाचा पाचवा गडी बाद केला. २० व्या षटका अखेर श्रीलंकेच्या संघाने देखील ५ गडी बाद २०२ धावा करत सामना बरोबरीत आल्याने सुपर ओव्हर खेळविण्यात आल्या.
सुपरओव्हर मध्ये श्रीलंकेच्या संघाने दोन गडी बाद दोन धावा केल्या तर भारतीय संघाच्या सूर्यकुमार यादवने १ चेंडूत ३ धावा करत सुपर ओव्हर मध्ये भारतीय संघ विजयी झाला.





