मुंबई । Mumbai
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महायुतीला मोठे यश मिळाले. महाविकास आघाडीला मोठा झटका बसला. त्यानंतर सर्वत्र ईव्हीएम हॅक करण्याची चर्चा सुरु झाली.
यावेळी अनेक नेत्यांकडून एक्स(ट्वीटर) समाज माध्यमावरून एका हॅकरची चित्रफीत अपलोड करण्यात आली आहेत. त्यात आपण ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो, असा दावा एका हॅकरने केला आहे. त्या चित्रफीतीतील ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबईतील दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आता तपास सुरू करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, सय्यद शुजा याने अनेक धक्कादायक दावे केले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम बनवणाऱ्या टीममध्ये आपणही होतो, असा दावा केला होता. एका विशिष्ट प्रणालीचा वापर करून ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असा दावा त्याने केला. काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी देखील या दाव्यांच्या आधारे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले.
महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओतील दावे खोटे आहेत. हा सर्व प्रकार खोटा आणि अप्रमाणित आहेत. ईव्हीएम टँपरफ्रूफ आहे. कोणत्याही नेटवर्कसोबत त्याला जोडत येत नाही. मुंबई सायबर पोलिसांनी या व्हिडिओतील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.