Monday, April 27, 2026
Homeक्राईम​Ashok Kharat Case : सिन्नरच्या आणखी चार पतसंस्था रडारवर; खरात प्रकरणातील 'जगदंबा'...

​Ashok Kharat Case : सिन्नरच्या आणखी चार पतसंस्था रडारवर; खरात प्रकरणातील ‘जगदंबा’ नंतर संशयास्पद आर्थिक व्यवहारांची तपासणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भोंदू अशोक खरात प्रकरणाने नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) सहकार क्षेत्रात उठलेले वादळ शमण्याचे नाव घेत नसतानाच आता जगदंबा पतसंस्थेतील काळ्या कारभाराचे धागेदोरे आता सिन्नरमधील (Sinnar) इतर चार बड्या पतसंस्थांपर्यंत पोहोचले आहेत. तपास यंत्रणांनी आपला मोर्चा आता या चार पतसंस्थांकडे वळवला आहे. विशेष म्हणजे, या चारही पतसंस्थांनी जगदंबा स्टाईलनेच आर्थिक व्यवहार केल्याचे समोर येत असल्याने सिन्नरच्या सहकार वर्तुळात आता कोणाचे मरण, कोणाच्या दारात अशी भीती पसरली आहे.

- Advertisement -

राज्य पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक व दिग्गज नेते काका कोयटे यांना असंगाशी संग नडले. या प्रकरणामुळे त्यांना आपले मानाचे पद सोडावे लागले. कोयटेंच्या गच्छंतीनंतर आता सिन्नरमधील त्या चार पतसंस्थांच्या संचालकांचे व मॅनेजरचे धाबे दणाणले आहे. या संस्थांनी नेमके कोणाचे हित जोपासले आणि नियमबाह्य कर्जवाटप करून ठेवीदारांच्या पैशांशी खेळ मांडला का? याचा तपास आता सहकार विभाग आणि पोलीस (Police) यंत्रणा संयुक्तपणे करत आहेत.

जगदंबा पतसंस्थेचे चेअरमन नामकर्ण आवारे हे स्वतःला कितीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ भासवत असले, तरी वास्तवातील परिस्थिती वेगळीच असल्याचे आता समोर आले आहे. नुकतीच सिन्नर पोलिसांनी जगदंबाचा मॅनेजर अविनाश कांडेकर याला अटक केल्याने आवारे यांचे धाबे दणाणले आहेत. कांडेकरच्या चौकशीतून सिन्नरमधील इतर चार पतसंस्थांसोबत झालेले संशयास्पद व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण उघड होण्याची दाट शक्यता आहे.

ऑडिटर्स की वाटेकरी?

या संपूर्ण प्रकरणात आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे ऑडिटर नक्की होते कुठे? जगदंबासह इतर चार संस्थांमध्ये कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची बीजे रोवली जात असताना ऑडिटर्सना याचा सुगावा कसा लागला नाही? खरातचा तथाकथित सीए पोफळेच्या अडचणीत वाढ होत असतानाच, आता इतर काही खासगी ऑडिटर आणि सीए देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. संस्थांच्या ताळेबंदावर सक्षम असा शेरा मारणाऱ्या या ऑडिटर्सनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली का, याची चौकशी सुरू झाली आहे.

पुढचा नंबर कोणाचा?

सिन्नरमधील या चार पतसंस्थांनी जगदंबाचीच री ओढल्याने आता सहकार क्षेत्रातील मोठ्या प्रस्थांचे नाव समोर येण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांचा फास जसा आवळला जाईल, तसे अनेक बडे मासे गळाला लागतील. सध्या तरी सिन्नरमधील या पतसंस्थांच्या पोटात गोळा उठला असून, ठेवीदारांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. सहकारात स्वार्थ शिरला की संस्था कशी रसातळाला जाते, याचे जगदंबा हे जिवंत उदाहरण ठरले आहे. आता सिन्नरमधील इतर चार संस्थांच्या चौकशीतून काय बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 : बंगळूरु समोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; कुणाचे पारडे जड?

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (सोमवारी) नवी दिल्ली (New Delhi) येथील अरूण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्स...