नाशिक | प्रतिनिधी | Nashik
त्र्यंबकेश्वर देवस्थानातील व्हीआयपी दर्शन घोटाळ्याचा (Trimbakeshwar Darshan Scam) तपास करणाऱ्या एसआयटीने या साखळीतील मुख्य म्होरक्या वसंत उर्फ नारायण कचरू मुर्तडक (२६) याला अखेर गुरुवारी रात्री अटक केली आहे. शुक्रवारी (दि. २४) जिल्हा न्यायालयाने त्याला २८ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून या अटकेमुळे घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे धागेदोरे आता पोलिसांच्या (Police) हाती लागले आहेत. दरम्यान, मुर्तडक हा त्र्यंबकेश्वरमध्ये एजंट म्हणूण कुप्रसिद्ध असल्याचे उघड झाले आहे.
संशयित मुर्तडक हा एजंटच नव्हे तर संपूर्ण साखळीचे नेतृत्व करत होता आणि त्याचे सात साथीदार देशभरातील भाविकांशी संपर्क साधून अवघ्या १५ मिनिटांत व्हीआयपी दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवत होते, असे पुरावे एसआयटीने संकलित केले आहेत. प्रत्येक भाविकाकडून २ ते १२ हजार रुपये उकळून त्यांना गाभाऱ्यात दर्शन घडविले जात होते. धक्कादायक म्हणजे, मुर्तडक दररोज २५ ते २८ हजार रुपयांचे कलेक्शन केल्यावर त्यातील तब्बल ७० ते ७२ टक्के रक्कम मुख्य संशयित विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याला पोहोचवित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
एसआयटीने (SIT) मुर्तडकच्या बँक खात्यांचे स्कॅनिंग केले असता, आर्थिक व्यवहारांचा खनिजा हस्तगत केला आहे. कडलग आणि इतर संशयितांच्या मदतीने या खात्यात ६०० पेक्षा जास्त वेळा पैशांची देवाणघेवाण झाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. भाविकांकडून घेतलेले पैसे कोणत्या मार्गाने आणि कोणाकोणापर्यंत पोहोचले, याचा सविस्तर रूट शोधण्यासाठी पोलिस आता मुर्तडकची कसून चौकशी करत आहेत.
कडलगसह चौघांची रवानगी कारागृहात
या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आणि देवस्थानचा माजी विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, त्याचे पुतणे ओम व अभिषेक कडलग आणि साथीदार गोटीराम पेहरे यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुनावणीनंतर या चौघांनाही न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) ठेवण्याचे आदेश दिल्याने त्यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
भाविकांना तक्रार करण्याचे आवाहन
गुन्हा नोंद होण्यापूर्वीच्या चार दिवसांआधी कडलग, मुर्तडक साखळीने ७१ भाविकांना | पाहुणे म्हणून दर्शन दिल्याचे | पुरावे समोर आले होते. परराज्यातील अनेक भाविकांनी एजंटांना पैसे दिल्याची कबुली दिली असली, तरी अधिकृत तक्रार देण्यासाठी अद्याप कोणी पुढे आलेले नाही. “भाविकांनी न डगमगता तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसआयटी प्रमुख तथा पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी केले आहे.





