Friday, April 3, 2026
Homeनगररूग्णवाहिकेच्या स्टेअरिंगपासून ‘गुन्हेगारीच्या स्टेअरिंग’पर्यंत

रूग्णवाहिकेच्या स्टेअरिंगपासून ‘गुन्हेगारीच्या स्टेअरिंग’पर्यंत

गौरव घायाळच्या सुपा गावातील दहशतीला एलसीबीकडून लगाम

अहिल्यानगर | क्राईम डायरी| सचिन दसपुते

अहिल्यानगर- पुणे महामार्गावर झपाट्याने उभारली जाणारी सुपा औद्योगिक वसाहत जिल्ह्याच्या आर्थिक नकाशावर एक महत्वाचा टप्पा ठरत आहे. औद्योगिक वसाहतीतील विकासामुळे रोजगार, गुंतवणूक आणि स्थानिकांना व्यापारी संधी मिळत आहेत. मात्र या आर्थिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर सुपा गाव मात्र वेगळ्या ‘दहशतीच्या अर्थकारणाला’ सामोरे जात आहे. गावात काही सराईत गुन्हेगार आपली दादागिरी दाखवून व्यावसायिकांना त्रास देत आहेत. त्यात सर्वात कुख्यात नाव म्हणजे गौरव हरीभाऊ घायाळ. गावातील छोटे-मोठे व्यावसायिक त्याच्या दहशतीला वैतागले आहेत.

- Advertisement -

शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करत खंडणीची मागणी करणारा गौरव साधा रूग्णवाहिका चालक मात्र, अलिकडच्या काळात त्याच्या वाढलेल्या दहशतीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी लगाम घातला. दरोड्याच्या तयारीत असताना त्याला गजाआड केले. पुढे त्याच्यावर कठोर कारवाईची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

गौरव घायाळ हा साधा रूग्णवाहिका चालक आहे, मात्र त्याची दुसरीबाजू गुन्हेगारीची आहे. 2018 पासून त्याचा प्रवास नशा, हिंसाचार आणि खंडणीच्या गुन्ह्यांकडे वळला. सुरूवातीला मारहाण, शिवीगाळ, धमक्या यावरून नोंद झाली. पण जसजसा काळ गेला तसतसे गुन्हे गंभीर स्वरूपाचे होत गेले – सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना धमकावणे, महिलांचा छळ, जातीवाचक शिवीगाळ, आग लावणे, व्यावसायिकांकडून पैसे उकळणे. एक साधा चालक कसा गुन्हेगारीचा चेहरा झाला याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. गावातील छोटे-मोठे व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना तो शस्त्रांचा धाक दाखवून पैसे मागतो. स्थानिक अर्थकारण हे औद्योगिक वसाहतीवर अवलंबून असताना गावच जर असुरक्षित राहिले तर विकासाच्या गाडीत तडा जाणार यात शंका नाही.

अहिल्यानगर शहरातील ललित गांधी यांचे सुपा गावात पानशॉप आहे. शुक्रवारी (19 सप्टेंबर) सायंकाळी तिथेच गौरव कट्टा कमरेला खोसून पोहोचला आणि महिन्याला पाच हजार रूपये खंडणीची मागणी केली. दुकान चालवायचे असेल तर पैसे द्या, नाहीतर दुकान फोडून टाकीन असा धमकीचा पवित्रा घेतला. हा प्रसंग गावातील इतर व्यावसायिकांसाठीही स्पष्ट संदेश होता – गौरवला पैसे दिले नाहीत, तर व्यवसाय बंद होणार या भितीने व्यावसायिक घाबरले. गौरव हा कायमच सुपा गावात दहशत करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक सुपा पोलीस देखील त्याच्या दहशतीला लगाम घालू शकलेले नाहीत. एखादा गुन्हा केल्यानंतर त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला आत टाकण्यापलिकडे गौरवविरेाधात ठोस कारवाई झालेली नव्हती. त्याच्या या वागणूकीमुळे त्याच्यातील हिंमत आणखी वाढत गेली. 2018 पासून सुरू झालेला गुन्हेगारी प्रवास अजूनही सुरूच आहे. तो पूर्वी एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याचेही माहिती आहे. त्याला वठणीवर आणण्यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

गौरव घायाळची दहशत केवळ सुपा गावापुरती नाही, तर ती प्रशासनाच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह आहे. कारण रूग्णवाहिका चालक गावात ‘दादागिरीचा ब्रँड’ निर्माण करू शकतो, तर उद्या दुसरा कोणीतरी त्याच्या जागी येऊ शकतो. म्हणूनच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी सततची धडक कारवाई, कठोर प्रतिबंधात्मक उपाय आणि राजकीय दबावाला न जुमानता पोलिसांची भुमिका आवश्यक आहे. गौरव घायाळ गजाआड झाला आहे, पण सुपा गाव गुन्हेगारीच्या दहशतीतून मुक्त झाले आहे का? – हा प्रश्न मात्र अजूनही हवेत आहे.

एलसीबीचा सापळा, दहशतीला धक्का
गौरवची सुपा गावातील दहशत मोडीत निघाली पाहिजे यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पुढाकार घेतला. गौरवने साथीदारांना सोबत घेत शस्त्रासह दरोड्याची तयारी केली असल्याची कुणकुण एलसीबीला लागताच त्यांनी गौरवच्या दादागिरीला वठणीवर आणण्यासाठी आखलेली कारवाई निर्णायक ठरली. दरोड्याची तयारी करताना चास घाटाजवळ गौरव आणि त्याच्या साथीदारांना गजाआड करण्यात आले. गावठी कट्टा, तलवार, बेसबॉल बॅटसारखी शस्त्रे जप्त झाली. या कारवाईनंतर गांधी यांनीही धैर्य दाखवत खंडणीची फिर्याद दाखल केली.

प्रशासनासाठी आव्हान
सुपा औद्योगिकदृष्ट्या प्रगत होत आहे, पण गावच गुन्हेगारीच्या सावलीत जगत असेल तर या विकासाचे मोल काय? व्यावसायिक गुंतवणूक करणार, उद्योग फुलणार, रोजगार वाढणार – पण दहशत आणि खंडणीमुळे हे सर्व थांबले तर जबाबदार कोण? प्रशासनाने याकडे केवळ गुन्हेगारी म्हणून न पाहता ‘औद्योगिक विकासाला धोका’ म्हणून बघणे गरजेचे आहे. गौरव घायाळ यापूर्वी हद्दपारही झाला होता. तरीही तो पुन्हा गावात परतून दहशत माजवू लागला. म्हणजेच, फक्त गुन्हे दाखल करणे पुरेसे नाही. त्याच्यावर मोक्का, तडीपार, एमपीडीए सारख्या कठोर कारवाया होणे आवश्यक आहे. अन्यथा आज गौरव, उद्या दुसरा ही भीती व्यावसायिकांच्या मनात कायम राहणार.

ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar : पुण्याची आता ‘वॉटर किंगडम’कडे वाटचाल; विजय वडेट्टीवार यांची...

0
मुंबई । Mumbai पुणे शहर आणि जिल्ह्याला गुरुवारी रात्री अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जबरदस्त तडाखा दिला. अवघ्या काही तासांच्या पावसाने संपूर्ण पुणे शहराची दाणादाण उडवली...