Friday, May 1, 2026
HomeराजकीयVijay Wadettiwar : पुण्याची आता 'वॉटर किंगडम'कडे वाटचाल; विजय वडेट्टीवार यांची बोचरी...

Vijay Wadettiwar : पुण्याची आता ‘वॉटर किंगडम’कडे वाटचाल; विजय वडेट्टीवार यांची बोचरी टीका

मुंबई । Mumbai

पुणे शहर आणि जिल्ह्याला गुरुवारी रात्री अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जबरदस्त तडाखा दिला. अवघ्या काही तासांच्या पावसाने संपूर्ण पुणे शहराची दाणादाण उडवली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पुणेकरांना फुकटात वॉटर सफारी मिळाली असून स्मार्ट सिटी आता ‘वॉटर किंगडम’कडे वाटचाल करत आहे,” अशी उपहासात्मक टीका त्यांनी शुक्रवारी केली.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यात २ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या अवकाळी पावसाने जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि शहर दोन्ही ठिकाणी हाहाकार माजवला आहे. सोसाट्याचा वारा आणि मोठ्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील सुमारे १०५ गावांमध्ये निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील १७८५ हेक्टरवरील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने गहू, कांदा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हातातोडांशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

पुणे शहरात ५७ मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्याची सरासरी ९ मिमी इतकी राहिली. गुरुवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पुण्यातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. शहराच्या अनेक भागांत पाणी साचल्याने ‘स्मार्ट सिटी’च्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वडेट्टीवार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या कामगिरीवर सडकून टीका केली.

वडेट्टीवार बोलताना म्हटले की, पुणेकरांनी भाजपला नेहमीच भरभरून दिले आहे. शहरात भाजपचे ६ आमदार, ११९ नगरसेवक, १ खासदार, १ केंद्रीय मंत्री आणि राज्यातील कॅबिनेट व राज्यमंत्री वास्तव्यास आहेत. एवढी मोठी राजकीय ताकद असतानाही अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात पुणे शहर अक्षरशः बुडाले. इतर वेळी विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी पुढे येणाऱ्या पुण्याच्या ‘स्वयंघोषित शिल्पकारांना’ आता या परिस्थितीचेही श्रेय दिले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

शहरातील जलमय रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या दुरवस्थेवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. “पुणेकरांना अजून किती विकास हवा आहे?” असा उपरोधिक सवाल करत त्यांनी महापालिका आणि राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या संपूर्ण जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरत असून, बाधितांना तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या