अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar
सायबर गुन्हेगारांनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सावेडी हाडको परिसरातील एका 61 वर्षीय सेवानिवृत्त क्लासवन अधिकार्याला व त्यांच्या पत्नीला तब्बल तासभर ‘डिजिटल अरेस्ट’ करून ठेवले. घरातील एका खोलीत दोघांना बंद करून त्यांच्या बँक खात्यांची, गुंतवणुकीची व आर्थिक व्यवहारांची माहिती घेत असतानाच नातेवाईकांना या प्रकाराचा संशय आला. त्यांनी तात्काळ डायल 112 वरून पोलिसांशी संपर्क साधला. तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून दाम्पत्याची डिजिटल अरेस्टमधून सुटका केली. पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास आणखी सुमारे 15 मिनिटांचा उशीर झाला असता, तर सायबर भामट्यांच्या हाती सुमारे 40 लाख रूपयांची संपत्ती जाण्याची शक्यता होती. नातेवाईकांची दक्षता आणि पोलिसांची सतर्कता यामुळे सेवानिवृत्त अधिकार्याचे लाखो रूपये वाचले.
सावेडी हाडको परिसरात संबंधित सेवानिवृत्त क्लासवन अधिकारी कुटुंबासह राहतात. सध्या ते आणि त्यांची पत्नी घरी असतात. त्यांची मुलगी विवाहित आहे. 3 सप्टेंबर रोजी अधिकारी व त्यांची पत्नी घरी असताना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर ऑडिओ कॉल आला. समोरून मराठीत बोलणार्या व्यक्तीने आपण कुलाबा (मुंबई) पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या विरोधात छेडछाड, दमदाटी तसेच अतिरेकी कारवाईसाठी सिमकार्डचा वापर केल्याप्रकरणी तब्बल 21 गुन्हे दाखल असल्याचा धक्कादायक दावा त्याने केला. सेवानिवृत्त अधिकार्यांनी आपण असे कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगितले. त्यावर सायबर भामट्याने, तुम्ही हे केले नसेल तर तसे सिध्द करावे लागेल; अन्यथा कुलाबा पोलीस ठाण्यात यावे लागेल, असे सांगत अधिकार्याला घाबरविण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याच्या मोबाईलवर पाच-सहा छायाचित्रे पाठविण्यात आली. ही छायाचित्रे दहशतवाद्यांची असल्याचे सांगून संबंधितांनी तुमच्या नावाच्या सिमकार्डचा वापर पाकिस्तानमध्ये बसून केल्याचा बनाव करण्यात आला.
तुमचा या व्यक्तींशी कोणताही संबंध नाही हे सिध्द करण्यासाठी तुमचा कॉल वरिष्ठ अधिकार्यांकडे जोडत असल्याचे सांगून काही वेळातच व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करण्यात आला. या कॉलमध्ये महाराष्ट्र पोलिसांचा लोगो असलेली खोली दिसत होती. त्यामुळे समोरील व्यक्ती खरोखरच पोलीस दलातील अधिकारी असल्याचा विश्वास सेवानिवृत्त अधिकार्याला बसला. काही वेळाने व्हिडीओ कॉल सुरू असतानाच समोरच्यांनी स्वतःचे चित्र दिसणे बंद केले. यानंतर सायबर भामट्यांनी अधिकार्याला आणि त्यांच्या पत्नीला घरातील एका खोलीत जाण्यास सांगितले. तसेच खोली आतून बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दाम्पत्य खोलीत गेले आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर तुमची माहिती ऑनलाइन रेकॉर्ड होत आहे. आम्ही सांगतो तसेच करावे लागेल. तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.
दरम्यान, 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी वडिलांना राखी बांधण्यासाठी येता न आल्याने अधिकार्यांची मुलगी 3 सप्टेंबर रोजी घरी आली होती. मात्र, घरात आई-वडील एका खोलीत दरवाजा बंद करून बसले असल्याचे आणि बाहेरून बोलावूनही प्रतिसाद देत नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने ही माहिती आपल्या मामाला, म्हणजेच सेवानिवृत्त अधिकार्याच्या मेव्हण्याला दिली. सायबर भामट्यांनी मुलीला वडिलांना राखी बांधण्यासाठी अवघे चार मिनिटे दिली. त्या वेळेत तिने वडिलांना राखी बांधली आणि खोलीबाहेर आली. मात्र, हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यावेळी तिच्याही लक्षात आले नाही. काही वेळाने सेवानिवृत्त अधिकार्याचे मेव्हणे घरी आले. त्यांनी दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, आतून अधिकार्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. आपण सुरक्षित असल्याचे सांगून तुम्ही येथून निघून जा, असे ते मेव्हण्याला सांगत होते. या प्रकारामुळे मेव्हण्याला संशय आला. त्यांनी विलंब न करता डायल 112 वरून पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांचा तात्काळ प्रतिसाद
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीही दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आणि खोलीमध्ये काहीतरी वेगळाच प्रकार सुरू असल्याचा संशय बळावल्याने त्यांनी नातेवाईकांच्या संमतीने दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. काही वेळातच दरवाजा तोडून पोलीस व नातेवाईक खोलीमध्ये गेले. त्यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व त्यांची पत्नी प्रचंड घाबरलेल्या आणि तणावाखाली असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दरवाजा का तोडला, असा जाब त्यांनी विचारला. त्यावर उपनिरीक्षक दळवी यांनी आपण तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले. समोरील व्यक्ती जर पोलीस अधिकारी असतील, तर त्यांना तोफखाना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊ, असा विश्वास त्यांनी दाम्पत्याला दिला. यानंतर डिजिटल अरेस्टचा प्रकार समोर आला.
बँक खात्यांची माहिती घेतली
सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सेवानिवृत्त अधिकारी व त्यांच्या पत्नीला सुमारे तासभर व्हिडीओ कॉलवर ठेवले होते. या कालावधीत त्यांच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यांची माहिती तसेच खात्यांवरील गुंतवणुकीची माहिती घेण्यात आली. ऑनलाइन जबाब नोंदविण्याच्या नावाखाली आर्थिक माहिती मिळविण्याचा सायबर भामट्यांचा डाव होता.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे ही माहिती पुढील आर्थिक फसवणुकीसाठी वापरण्यापूर्वीच प्रकार उघडकीस आला.




