Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime Diary : ‘ड्रग्ज फ्री अहिल्यानगर’ मोहिमेलाच पोलिसांचा खोडा?

Crime Diary : ‘ड्रग्ज फ्री अहिल्यानगर’ मोहिमेलाच पोलिसांचा खोडा?

अधिकारी-कर्मचार्‍यांचा कथित सहभाग व तपासातील त्रुटींमुळे चिंता

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

तरूणाईला ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सुरू केलेल्या ‘ड्रग्स फ्री अहिल्यानगर’ मोहिमेला राजकीय नेतृत्वासह सर्वसामान्य लोकांकडून पाठबळ मिळत असतानाच पोलीस दलातीलच काही प्रकरणांमुळे या मोहिमेला खोडा घातला जात असल्याचे समोर आले आहे. संगमनेर शहरातील एका ड्रग्स प्रकरणात तरूणाला गुन्ह्यात अडकविल्याचा नातेवाईकांचा आरोप, अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांची वादग्रस्त ठरलेली गांजा कारवाई आणि तोफखाना पोलिसांकडून ड्रग्स प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची वेळ आलेली घटना, या तीन प्रकरणांनी पोलिसांच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मे 2026 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ड्रग्सविरोधात विशेष मोहीम राबविण्यास सुरूवात केली. अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची खरेदी-विक्रीची साखळी मोडून काढण्याबरोबरच तरूणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. अहिल्यानगर शहरासह श्रीरामपूर, संगमनेर आणि जिल्ह्यातील अन्य भागांत गांजा, अल्फाझोलम, मेफेड्रोन, नशेची इंजेक्शन्स यांसारख्या अंमली पदार्थांची उपलब्धता असल्याचे विविध कारवायांतून समोर आले आहे. वाढत्या ड्रग्सच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने कारवाईबरोबरच जनजागृती अभियानालाही गती दिली आहे. अहिल्यानगर व श्रीरामपूर शहरात काढण्यात आलेल्या ड्रग्सविरोधी जनजागृती रॅलीत राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या मोहिमेला पाठबळ देण्याची भूमिका घेतली आहे. केंद्राच्या ‘नशामुक्त भारत’ संकल्पनेच्या माध्यमातून राज्यातही अंमली पदार्थविरोधी जनजागृतीला चालना दिली जात आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिसांनीही अंमली पदार्थविरोधी कारवाईला प्राधान्य दिले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जनजागृती अभियानाचे पालकमंत्री विखे पाटील यांनी कौतुक केले आहे. मात्र, एका बाजूला पोलीस अधीक्षकांकडून ड्रग्सविरोधात कठोर भूमिका घेतली जात असताना दुसर्‍या बाजूला काही पोलीस ठाण्यांतील प्रकरणांमुळे या मोहिमेच्या अंमलबजावणीवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.

संगमनेर शहर पोलिसांनी केलेल्या एका ड्रग्सविरोधी कारवाईत एका तरूणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. मात्र, संबंधित तरूणाच्या नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक सुदर्शन यांची भेट घेऊन गंभीर आरोप केले. आपल्या मुलाला ड्रग्सच्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांसमोर सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकासह काही कर्मचार्‍यांचा कथित सहभाग असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. प्रकरणाची गंभीर दखल घेत अधीक्षक सुदर्शन यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.
यापूर्वी तोफखाना पोलिसांनी सावेडी उपनगरात सुमारे 155 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले होते. या कारवाईनंतर गुन्ह्याचा तपास सुरू झाला.

मात्र, तपासादरम्यान तपासी अधिकार्‍यांच्या भूमिकेबाबत आरोप झाले. तसेच या प्रकरणातील ड्रग्सच्या खरेदी-विक्रीची पुढील साखळी शोधण्यात तपास यंत्रणेला अपेक्षित यश ुमिळाले नसल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर अधीक्षक सुदर्शन यांनी या प्रकरणाची दखल घेत हा तपास तोफखाना पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. त्यानंतर एलसीबीने तपासाला वेग देत ड्रग्सच्या खरेदी-विक्रीची साखळी शोधण्यास सुरूवात केली. एलसीबीच्या तपासात आतापर्यंत 53 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या पातळीवर अपेक्षित असलेला तपास एलसीबीने पुढे नेल्याचे चित्र आहे. या प्रकरणात तपासातील त्रुटी आणि त्यानंतर झालेली कारवाई यामुळे पोलीस ठाण्यांच्या तपास यंत्रणेच्या कार्यपध्दतीवरही चर्चा सुरू झाली आहे.

कोतवाली पोलीस चौकशीच्या फेर्‍यात
अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी केलेली गांजाची कारवाईही सध्या चौकशीच्या फेर्‍यात आहे. या कारवाईदरम्यान तयार करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये, स्टेशन डायरीतील नोंदींमध्ये आणि सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येणार्‍या घटनाक्रमात विसंगती असल्याची तक्रार करण्यात आली. या तक्रारीची पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर कोणताही परिणाम होऊ नये आणि चौकशीची प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडावी, यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यातील चार पोलीस अंमलदारांच्या अन्य पोलीस ठाण्यांत तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला बदलीच्या ठिकाणी तातडीने कार्यमुक्त करण्यात आले आहे.

पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्न
अंमली पदार्थांविरोधात कारवाई करणार्‍या यंत्रणेतीलच काही अधिकारी-कर्मचार्‍यांवर आरोप होणे, कारवाईच्या नोंदींमध्ये कथित विसंगती आढळणे किंवा एखाद्या गुन्ह्याचा तपास अपेक्षित पध्दतीने न झाल्याने तो वरिष्ठ तपास यंत्रणेकडे वर्ग करण्याची वेळ येणे, या घटनांमुळे जिल्हा पोलिसांची बदनामी होत आहे. यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कार्यकाळातही स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस कर्मचार्‍याने पोलिसांच्या ताब्यातील ड्रग्सची विक्री केल्याचा प्रकार समोर आला होता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...