अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar
नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव व ईद मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात वाजवण्यात आलेल्या डीजेविरोधात जिल्हा पोलिसांनी कारवाई करत एकूण 75 गुन्हे दाखल केले असून सर्व डीजे (डिस्क जॉकी) साहित्य जप्त केले आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण झाले, मात्र यावेळी जिल्हा पोलिसांनी साहित्य बॉन्डवर सोडणार नाही, असा निर्णय घेतल्याने डीजे मालकांना चांगलीच झळ बसली आहे. वर्षभर महापुरूषांच्या होणार्या जयंती मिरवणुका, दांडगे विवाह सोहळे असे बरेच काही रस्त्यावर, सार्वजनिक जागेवर सुरू असते. त्यात आपण मोठ्या उत्साहाने, आनंदाने सहभागी होतो. सर्व उत्सव साजरे झालेच पाहिजे मात्र, यात कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून जो गोंगाट होतो त्याचे गंभीर परिणाम होत आहे.
मिरवणुक, उत्सव पार पडल्यानंतर डीजे साहित्य जप्त करून डीजे मालकांसह आयोजकांवर पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदूषण नियमांनुसार गुन्हे दाखल केले जातात. पुढे या गुन्ह्याचा कागदोपत्री तपास करून न्यायालयात दोषोरोपपत्र दाखल होते. न्यायालयात ही सर्व प्रक्रिया सुरू असते. जिल्ह्यात आतापर्यंत ज्या डीजे संदर्भात गुन्हे दाखल झाले ते न्यायप्रविष्ठ असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुद्दा हा आहे की, डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण होते. नियम, कायदे असून देखील पोलिसांचे हात बांधलेले आहे. त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही किंवा त्यांना ती करू न देण्यास भाग पाडले जाते. पोलिसांनी गुन्हे दाखल करून डीजे साहित्य जप्त केल्यानंतर ते काही तासांत बॉन्ड घेऊन सोडून दिले जाते.
यामुळे डीजे मालकांवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. कारण गुन्हे दाखल होऊन देखील ते न्यायप्रविष्ठ आहेत. तर पोलिसांनी डीजे साहित्य जप्त करून देखील ते पुन्हा काही तासांत परत मिळते. जिल्ह्यात शेजारील जिल्ह्यातून डीजे आणले जातात, असे दिसून आले आहे. मात्र कारवाई दिखाऊ होत असल्याने पुन्हा येण्याची त्यांची हिंमत होते. उत्सव, विविध महापुरूषांच्या जयंती मिरवणुका, दांडगे विवाह सोहळे, वराती अशा सार्वजनिक उत्सव-कार्यक्रमांत डीजेचा दणदणाट ऐकू येत असतो. मोठ्या उत्साहाने होणारे हे सोहळे आनंददायी असले, तरी कर्णकर्कश डीजेमुळे निर्माण होणारा गोंगाट गंभीर आरोग्यविषयक परिणाम घडवतो. पोलिसांकडून वारंवार नोटिसा दिल्या जात असूनही डीजे वाजवले जातात. काहीवेळा राजकीय हस्तक्षेप, तर कधी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने पोलिसांवर दबाव येतो.
परिणामी, कायदे व न्यायालयाचे आदेश असूनही डीजे साहित्य काही तासांतच परत दिले जाते. यंदा मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक पवित्रा घेतला आहे. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, जप्त केलेले डीजे साहित्य बॉन्डवर सोडायचे नाही. न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसारच मालकांना साहित्य परत मिळेल. या आदेशामुळे अनेक डीजे मालक न्यायालयाची पायरी चढताना दिसत आहेत. पोलिसांचा उद्देश एकच – डीजे मालकांनी पुन्हा कधीही ध्वनीप्रदूषण करण्याची हिंमत करू नये. कर्णकर्कश आवाजाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. दीर्घकाळ मोठा आवाज ऐकल्यास बहिरेपणा, निद्रानाश, ताणतणाव, चिडचिड, रक्तदाब वाढ, डोकेदुखी अशा समस्या उद्भवतात. लहान मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो, तर वृध्द, गर्भवती स्त्रिया व हृदयविकाराच्या रूग्णांवर त्याचे दुष्परिणाम अधिक होतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 55 डेसिबलपेक्षा जास्त आवाज घातक आहे; पण उत्सवकाळात आवाजाची पातळी 100-110 डेसिबल सहज नोंदवली जाते.
उत्सव-समारंभ समाजातील एकात्मतेचे प्रतीक आहेत. पण आनंद साजरा करताना इतरांच्या आरोग्याशी खेळ करणे योग्य नाही. पोलीस, न्यायालय व प्रशासन कठोर कारवाई करत असले तरी खरी गरज आहे ती जनजागृतीची व स्वअनुशासनाची. सण-उत्सव हे आयुष्य समृध्द करणारे असावेत, संपवणारे नव्हेत, हेच यामधून अधोरेखित होते.
पाथर्डी तालुक्याचा आदर्श प्रयोग
पाथर्डी तालुक्यात यंदाच्या गणेशोत्सवात एकाही मंडळाने डीजे वाजवला नाही. यासाठी आमदार मोनिका राजळे आणि पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पुढाकार घेतला. शांतता समितीच्या बैठकीत डीजेच्या दुष्परिणामांची माहिती दिल्यानंतर, तालुक्यातील दोनशेहून अधिक मंडळांनी डीजेविना पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणुका काढल्या. यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले तर अधीक्षक घार्गे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. इच्छाशक्ती बरोबरच राजकीय व प्रशासकीय पाठबळाच्या जोरावर हे शक्य झाले असल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली.
राजकीय विरोध झुगारला
डीजे वाजले, गुन्हे दाखल झाले. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदा डीजे साहित्य मालकांना मिळत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. राजकीय व्यक्तींकडून डीजे साहित्य सोडून देण्यासाठी पोलिसांना फोन केले जात आहे. मात्र डीजे वाजवून ध्वनीप्रदुषण तर झाले, मात्र ते पुन्हा वाजले नाही पाहिजे यासाठी अधीक्षक घार्गे यांनी डीजे साहित्य तात्काळ न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालय आदेश देईल त्यानुसार कार्यवाही केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय नेत्यांचा विरोध झुगारून पोलिसांनी घेतलेली भूमिका महत्वाची आहे.





