Wednesday, June 17, 2026
Homeक्राईमCrime Diary : पोलीस ठाण्यांत न्यायाचा सौदा ?

Crime Diary : पोलीस ठाण्यांत न्यायाचा सौदा ?

पाच महिन्यांत पाच ठाण्यांतील सहा पोलीस लाचेच्या जाळ्यात!

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

जिल्हा पोलीस दलातील वाढती लाचखोरी आता केवळ चर्चेचा विषय राहिलेली नसून ती सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारी गंभीर बाब ठरत आहे. कायद्याचे पालन करून नागरिकांना न्याय देण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचारीच लाचेच्या मोहात अडकत असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या पाच महिन्यांत (जानेवारी ते मे) जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये तब्बल पाच पोलीस कर्मचारी आणि एका अधिकार्‍याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

- Advertisement -

या कारवायांमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. कुठे वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी हप्ते मागितले गेले, तर कुठे गुन्ह्यातील संशयित आरोपींना मदत करण्यासाठी लाखोंच्या मागण्या करण्यात आल्या. अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी देखील पोलीस कर्मचार्‍यांनी पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे ‘पोलीस ठाण्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही’ अशी सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली भावना अधिकच बळकट होत आहे.

शनिशिंगणापूर येथील मंदिर परिसरातील पूजा साहित्य विक्रेत्यांकडून दरमहा हप्ता उकळण्याचा प्रकार उघडकीस आला. मंदिरासमोरील दुकानांजवळ भाविक वाहने उभी करतात. त्यावर कारवाई न करण्याच्या बदल्यात पोलीस कर्मचार्‍याने दुकानदाराकडे दरमहा 1500 रूपयांची मागणी केली होती.
हप्ता न दिल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही देण्यात आली होती. अखेर दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली. शनिदेवाच्या दारातच पोलिसांकडून सुरू असलेली ही वसुली जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली. यानंतर एप्रिल महिन्यात तर लाचखोरीच्या घटनांची मालिका सुरूच राहिली. तोफखाना पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याने एका गुन्ह्यातील संशयित आरोपीला मदत करण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर तडजोडीअंती 35 हजार रूपये स्वीकारताना कर्मचारी रंगेहाथ पकडला गेला.

मिरजगाव (ता. कर्जत) पोलीस ठाणे हद्दीतील एका जुगार क्लब चालकाकडून अवैध क्लब सुरू ठेवण्यासाठी पोलीस कर्मचार्‍याने दरमहा पाच हजार रूपयांचा हप्ता मागितला होता. क्लब चालकाने थेट लाचलुचपत विभागाशी संपर्क साधत सापळा रचला आणि कर्मचार्‍याला पाच हजारांची लाच स्वीकारताना पकडले गेले. पाथर्डी पोलीस ठाणे तर यापूर्वीही अशा घटनांमुळे चर्चेत राहिले आहे. एप्रिल महिन्यात येथील दोन कर्मचार्‍यांनी अपघातात जप्त करण्यात आलेले वाहन सोडण्यासाठी सात हजार रूपयांची मागणी केली होती. यापैकी एक कर्मचारी पाच हजार रूपये स्वीकारताना पकडला गेला, तर दुसरा पसार झाला होता. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या सर्व घटनांमध्ये सर्वाधिक खळबळ उडवणारी कारवाई नुकतीच अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याशी संबंधित प्रकरणात झाली. पोलीस उपनिरीक्षकावर एका मारहाणीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला मदत करण्यासाठी तब्बल एक लाख रूपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे त्या अधिकार्‍याची नुकतीच सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती आणि त्याची बदली नाशिक येथे झाली होती. प्रशिक्षणासाठी तो पोलीस मुख्यालयात असतानाच लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली. त्याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाने पोलीस दलात मोठी खळबळ उडवली आहे.

15 मध्ये 5 पोलीस
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या पाच महिन्यांत विविध सरकारी विभागांमध्ये एकूण 15 कारवाया केल्या आहेत. त्यापैकी तब्बल पाच कारवाया केवळ पोलीस विभागात झाल्या आहेत. ही आकडेवारीच पोलीस दलातील वाढत्या भ्रष्टाचाराची गंभीरता अधोरेखित करणारी आहे. अनेक ठिकाणी फिर्याद दाखल करण्यापासून ते तपासातील मदतीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पैशांची मागणी केली जाते, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्ट आहेत असे नाही; अनेक जण प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. मात्र काहींच्या वर्तनामुळे संपूर्ण दलाची प्रतिमा मलिन होत आहे.

प्रभारींवर जबाबदारी
विशेष बाब म्हणजे पूर्वी एखादा पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेला, तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यालाही जबाबदार धरले जात होते. त्यांची बदली अथवा प्रशासकीय कारवाई केली जात होती. मात्र आता अशा कारवाया क्वचितच दिसून येतात. आपल्या ठाण्यातील तपास अधिकारी कसा तपास करतो, फिर्यादीला न्याय मिळतो का, पैशांची मागणी तर होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रभारी अधिकार्‍यांची असते. त्यामुळे केवळ लाच घेणार्‍या कर्मचार्‍यांवर नव्हे, तर त्यांच्या कार्यपध्दतीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या प्रभारी अधिकार्‍यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नवीन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारून एक महिना पूर्ण झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्याची आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा मिळवण्याची मोठी जबाबदारी आहे.

ताज्या बातम्या

पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ

0
पुणे | प्रतिनिधी Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात...