Tuesday, August 18, 2026
Homeक्राईमCrime Diary : सात-आठ महिन्यांतच ‘आउट’!

Crime Diary : सात-आठ महिन्यांतच ‘आउट’!

कोतवाली, तोफखाना, भिंगारचे नवे प्रभारी काय दाखवणार कर्तृत्व?

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

शहरातील वाढती गुन्हेगारी, पोलीस ठाण्यातील अंतर्गत गटबाजी, वरिष्ठांकडे झालेल्या तक्रारी आणि तपासातील ढिसाळ कामगिरी यामुळे शहरातील तिन्ही महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांचे प्रभारी बदलण्यात आले आहेत. कोतवाली आणि तोफखाना या शहरातील अत्यंत संवेदनशील पोलीस ठाण्यांच्या प्रभार्‍यांची अवघ्या सात ते आठ महिन्यांतच बदली करण्यात आली असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारीदेखील मुदतपूर्व बदलण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पोलीस दलात आणि शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. अचानक करण्यात आलेला हा बदल शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्याकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

- Advertisement -

खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर हाणामार्‍या, दोन समाजांतील तणाव, सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, घरफोडी आणि इतर चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कोतवाली पोलीस ठाण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे तर तोफखाना पोलीस ठाण्याची जबाबदारी निरीक्षक जगदीश भांबळ यांच्याकडे सोपविली होती. मात्र, अधीक्षक बदलल्यानंतर नव्याने पदभार स्वीकारलेल्या मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्याचा अभ्यास करून प्रभारी अधिकार्‍यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यानंतर ज्या अधिकार्‍यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता त्यांच्यासह तक्रारी असलेल्या अधिकार्‍यांवरही कारवाई करण्यात आली. यामध्ये कोतवालीचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांची अवघ्या आठ महिन्यांत तर तोफखान्याचे निरीक्षक जगदीश भांबळ यांची सात महिन्यांत बदली झाली. भिंगार कॅम्पचे प्रभारी मुलगीर यांचीदेखील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आली. याबाबत चर्चा रंगल्या आहेत. गेल्या पाच महिन्यांतील गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली असता खून, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, विनयभंग आणि दरोड्याच्या तयारीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा काही प्रमाणात निपटारा झालेला दिसतो. मात्र, चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी आणि जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यातील अनेक गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती.

प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथक असते. कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प येथेही ही यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, अंतर्गत राजकारण आणि गटबाजीमुळे ही पथके अपेक्षित परिणाम देऊ शकली नाहीत, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे. विशेषतः कोतवाली पोलीस ठाण्यातील अंतर्गत संघर्षामुळे अनेक तपासांवर परिणाम झाल्याचे बोलले जाते. काही गंभीर घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असले तरी त्यानंतर तपासाची गती मंदावल्याचे दिसून आले. प्रभारी अधिकारी सक्षम असेल तर खालच्या स्तरावरील अधिकारी आणि अंमलदारांकडून प्रभावी काम करून घेता येते. मात्र, कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये काही कर्मचार्‍यांनी प्रभारी अधिकार्‍यांनाच जुमानले नसल्याची चर्चा होती. त्याचा थेट परिणाम गुन्हे तपास आणि कायदा-सुव्यवस्थेवर झाल्याचे मानले जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता कोतवाली पोलीस ठाण्याची धुरा निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हाती देण्यात आली आहे. देशमुख यांना जिल्ह्यातील कामाचा अनुभव असून त्यांनी श्रीरामपूर शहरासारख्या संवेदनशील पोलीस ठाण्याचे प्रभारीपद यशस्वीपणे सांभाळले आहे. त्यामुळे शहरातील सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणार्‍या कोतवाली पोलीस ठाण्याकडून आता मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. दुसरीकडे तोफखाना पोलीस ठाण्याची जबाबदारी निरीक्षक बालाजी वैद्य यांच्याकडे देण्यात आली आहे. निरीक्षक पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांचे हे पहिलेच पोलीस ठाणे आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्व क्षमतेची खरी कसोटी आता लागणार आहे. तोफखाना परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि कर्मचारी वर्गाला एकत्रितपणे कामाला लावणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान असणार आहे.

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याची जबाबदारी प्रथमच एका महिला अधिकार्‍याच्या हाती देण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात सेकंड अधिकारी म्हणून काम करताना मिळालेला अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने त्या प्रभावी कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कार्यक्षमता सिध्द करण्याची संधी
मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात धार्मिक उत्सव सुरू आहे.अशा संवेदनशील काळात नव्या प्रभार्‍यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्याचबरोबर चोरी, घरफोडी, जबरी चोरी आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांचा छडा लावण्याचे आव्हानही त्यांच्या समोर उभे आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. निरीक्षक वैद्य जिल्ह्यात नवीन आहेत. तर, थोरात यांच्यावर पहिल्यांदाच पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या प्रभार्‍यांसाठी ही केवळ पदस्थापना नसून स्वतःची कार्यक्षमता सिध्द करण्याची मोठी संधी मानली जात आहे.

‘डिबी’तील गटबाजींचे आव्हान
प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथक (डिबी) कार्यरत आहे. मात्र, अंतर्गत राजकारण आणि गटबाजीमुळे ही पथके अपेक्षित परिणाम देऊ शकली नाहीत, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे. गटबाजीमुळे वारंवार ‘डिबी’ बरखास्त करण्याची वेळ प्रभारींवर येते. यामुळे ‘डिटेक्शन’वर परिणाम होतो. नव्या प्रभारींसमोर कायदा व सुव्यवस्था राखणे, चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे उघड करणे, अंतर्गत गटबाजी व कर्मचारी राजकारण रोखून गुन्हे शोध पथकांना सक्रिय करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचा जोर

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून काल सोमवारी श्रावणसरींचा जोर वाढल्याने धरणातून पाणी आणखी सोडण्यात येण्याची शक्यता...