अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar
जिल्ह्यातील सिस्पे, ट्रेडस, इन्फिनिटी यांसारख्या कंपन्यांमधील प्रचंड घोटाळा उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. शेकडो कोटी रूपयांचा खेळ करून संचालक मंडळ पसार झाले असले तरी या घोटाळ्याचे खरे सूत्रधार म्हणजे स्थानिक एजंट असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. एजंट नसते तर औताडे टोळीचे साम्राज्य उभेच राहिले नसते, असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. संपूर्ण घोटाळ्याचा आराखडा औताडे टोळीने आखला असला तरी, या पिरॅमिडसारख्या जाळ्याचे खरे पायाभूत आधार एजंटच ठरले.
त्यांच्या बळावरच हजारो गुंतवणूकदार या सापळ्यात अडकले. आता मनीट्रेल व बँक खात्यांच्या तपासामुळे एजंटांची खरी पोलपट्टी बाहेर पडत आहे. संचालक पकडले जातीलच; पण खरे धक्के बसणार आहेत ते एजंटांनाच, कारण गुंतवणूकदारांचा राग आणि पोलिसांच्या पुराव्यांचे जाळे – दोन्ही थेट त्यांच्या मानेला येऊन बसले आहे.
नवनाथ औताडे याने सिस्पे, ट्रेडस, इन्फिनिटी यांसारख्या अनेक कंपन्यांचे जाळे निर्माण करून त्यातून जादा परताव्याचे आमिष दाखविले. परंतु त्याचे खरे शस्त्र होते – स्थानिक एजंट. सुरूवातीला त्यांना स्वतः पैसे टाकायला भाग पाडले आणि नंतर नवीन गुंतवणूकदार आणा, मोठे कमिशन मिळेल असे सांगून एजंटगिरीकडे वळविले. 6, 10 ते थेट 20 टक्क्यांपर्यंत कमिशन दिल्याने एजंटांनी आपले नातेवाईक, मित्र, सहकारी यांना यात ओढले. काही एजंट पूर्णवेळ याच धंद्यात झोकून देत हजारो लोकांकडून पैसे गोळा करत होते. तर काही एजंट नाममात्र होते. एजंट लोकांचे बँक खाते पैशांनी फुगले, तर हजारो गुंतवणूकदारांचा घाम गाळून कमावलेला पैसा गुंतून पडला आहे.
आज संचालक मंडळ पसार आहे, पण एजंट मात्र बिनधास्तपणे गावात, शहरात फिरत असून समाजात आपली शान मिरवत आहेत. मात्र सुपा येथील गुन्ह्यात फिर्यादी असलेला एजंट विक्रम गाडीलकर याला पोलिसांनी सखोल पुराव्यानिशी संशयित आरोपी केल्याने इतर एजंट लोकांचे धाबे दणाणले आहेत. गाडीलकर हा सुरूवातीला आपली व इतर नातेवाईक, मित्र परिवारांची फसवणूक झाली म्हणून न्यायालयात गेला. न्यायालयाने देखील गाडीलकर याची फिर्याद नोंदवून घेण्याचे पोलिसांना आदेश दिले. पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली. मात्र, आपल लोकांना प्रलोभने दाखवून गैरलाभ घेतला असल्याचे गाडीलकरच्या लक्षात येताच त्याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. पोलिसांनी त्याचा खरा चेहरा न्यायालयासमोर उघडा पाडला व तो फिर्यादी नसून आरोपी असल्याचे लक्षात आणून दिले. गाडीलकर प्रमाणे इतर एजंट आरोपी होतील यात शंका नाही.
या घोटाळ्यात आतापर्यंत 25 जण संशयित आरोपी म्हणून निष्पन्न झाले असून त्यात संचालक मंडळासोबतच भागीदार आणि एजंटांचाही समावेश आहे. पोलिसांनी दोन एजंट आणि एका भागीदाराला अटक केली आहे. एजंटांनी गुंतवणूकदारांना खोट्या आश्वासनांनी पैसे घालायला भाग पाडले. काहींनी सरकारी नोकरीच्या पदाचा वापर करून लोकांना फसविले. शिक्षक, पोलीस, महसूल कर्मचारी यांपैकीही अनेकांनी एजंटगिरी करून आपल्या विभागातील लोकांना यात ओढले. सुरूवातीच्या परताव्यामुळे गुंतवणूकदारांना वाटले की योजना चांगली आहे, पण प्रत्यक्षात परतावा येणे बंद झाल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आहे. हजारो गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रूपये गुंतवले. नवनाथ औताडे टोळीने हे पैसे गिळंकृत करून पसार झाल्यानंतर पोलीस यंत्रणा हलली. मात्र, तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे खरा डंख औताडे टोळीबरोबरच एजंट यांनी दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
हजारो गुंतवणूकदारांकडून जमा झालेला पैसा वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावाने असलेल्या खात्यांत जमा होत होता. या पैशांचा काही भाग सुरूवातीच्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून वापरला जात होता. उर्वरित मोठा हिस्सा संचालक व प्रमुख एजंटांच्या खात्यांत ट्रान्सफर होत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या खात्यांचे स्टेटमेंट्स तपासायला सुरूवात केली असून, शेकडो कोटी रूपयांची उलाढाल झाली असल्याचे चित्र समोर आले आहे. पोलीस तपासात अनेक एजंटांचे बँक खाते व गुंतवणूकदारांशी झालेल्या व्यवहारांचे पुरावे समोर आले आहेत. एजंटांनी घेतलेले भरघोस कमिशन त्यांच्या खात्यांत स्पष्ट दिसत असल्याने, त्यांच्यावर आरोपपत्र भरणे जवळपास निश्चित झाले आहे. आतापर्यंत दोन एजंटांना अटक झाली असली तरी अजून अनेक जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
अनेकांनी आपल्या जवळचे पैसे, तर काही लोकांनी शेती गहाण ठेवून कर्ज घेतले व गुंतवणूक केली. सुरूवातीचे काही महिने परतावा आला, पण नंतर सर्व थांबले. पैसे अडकले आणि काही कुटुंब अक्षरशः उध्दवस्त झाले. ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच एजंट आम्हाला फसवून गेले. औताडे कोण आहे आम्हाला ठाऊक नव्हते; पण एजंटने माझ्यावर विश्वास ठेव म्हणून ओढले. आता तो एजंट ऐटदार फिरतो, आणि आम्ही मात्र कर्जबाजारी, अशी प्रतिक्रिया गुंतवणूकदार देत आहे. अनेक एजंट शासकीय नोकरदार होते. शिक्षक, पोलीस, महसूल विभागातील लोकांनी स्वतःची प्रतिमा वापरून विश्वास मिळवला. एजंटांनी लोकांना भेटून गुंतवणूक जोडली. काही एजंट पूर्णवेळ या व्यवसायात झोकून देत लोकांना जास्त परतावा मिळेल असे खोटे स्वप्न दाखवत होते. अनेक एजंटांचे घर, गाड्या, बंगल्यांचा थाट काही वर्षांतच उभा राहिला. त्यांचा हा झटपट उभारलेला ऐश्वर्यसिंहासारखा जीवनशैली आज गुंतवणूकदारांना जास्त जखमी करत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेची अडचण
श्रीगोंदा, सुपा व तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आतापर्यंत तीन गुन्हे तपासाखाली असून चौथा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. तो पण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होईल. मात्र प्रचंड व्याप, कागदोपत्री कामाचा ताण, कर्मचारी कमतरता यामुळे तपासात अडचणी येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणात लक्ष घातले असले तरी त्यांच्याकडून आर्थिक गुन्हे शाखेला म्हणावे तसे पाठबळ मिळत नाही. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला इतर पोलिसांची मदत दिली तर या गुन्ह्यातील पसार संचालक, भागीदार व एजंट गजाआड होतील. मात्र वरिष्ठांचे फक्त दाखविण्यापुरते यात लक्ष असल्याचे दिसून येते.
एजंटांविरोधात संताप
गुंतवणूकदारांचा रोष केवळ औताडे टोळीपुरता मर्यादित राहिलेला नाही. खरे तर एजंटच सर्वात मोठे दोषी आहेत. आमचा पैसा घेऊन ते कोट्याधीश झाले, आता समाजात बिनधास्त वावरत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. औताडे टोळीचा कारनामा उघड झाला असला तरी या प्रकरणाने सर्वात मोठा धडा दिला आहे – एजंटगिरीमुळेच घोटाळा बहरतो. समाजातील आपलेपणा, विश्वास आणि जवळिकीचा गैरफायदा घेत एजंटांनी हजारो लोकांना जाळ्यात ओढले. संचालक मंडळ पकडले जाईल तेव्हा जाईल; पण एजंटांच्या मुसक्या आवळल्याशिवाय गुंतवणूकदारांचा रोष थंड होणार नाही.





