अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुकुंदनगर परिसरात एका तरुणावर टोळक्याने चॉपर, लोखंडी रॉडने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. आज याला पेट्रोल टाकून जाळून टाकू, अशी धमकी देत संशयित आरोपींनी पीडित तरुणाच्या डोक्यात वार केले. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी बडी मशीद परिसरात घडली.
याप्रकरणी जखमी रेहान रौफ शेख (वय 27, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दानीष ऊर्फ धन्या, साहिल उर्फ बाऊ, उपेंरलाला, नाजिश ननु, अफनान उर्फ अफु, तालीम व इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेहान शेख हे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मुकुंदनगर येथील बडी मशिदीजवळ असताना संशयित आरोपींनी संगनमत करून त्यांना गाठले.
जुन्या वादातून आरोपींनी शेख यांना शिवीगाळ करत चॉपर, लोखंडी रॉड, दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एका आरोपीने आज याला पेट्रोल टाकून जाळून मारू, अशी धमकी दिली. रेहान यांस जीवे मारण्याचा प्रयत्न केला व घटनास्थळावरून पळ काढला. जखमी रेहान शेख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी रुग्णालयातूनच पोलिसांना जबाब दिला. त्यांच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.





