पुणे | प्रतिनिधी | Pune
पुण्यात (Pune) सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminal) थेट राज्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून एका ४३ वर्षीय महिला डॉक्टरला तब्बल ३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरांनी महिला डॉक्टरला ‘डिजिटल अरेस्ट’ आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची भीती दाखवून हे पैसे उकळले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करून घडलेल्या या फसवणुकीमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
हा संपूर्ण फसवणुकीचा (Fraud) प्रकार २२ ते २७ ऑक्टोबर दरम्यान घडला आहे. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिला डॉक्टरने तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पुढील तपासासाठी हा गुन्हा पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) वर्ग केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
ऑक्टोबर महिन्यात पीडित महिला डॉक्टरच्या मोबाईलवर (Mobile) एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने आपण ‘सायबर सेल ऑफ इंडिया’मधून चौधरी बोलत असून वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे असिस्टंट असल्याचे भासवले. त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या एका क्रमांकावरून फोन आला, ज्यामध्ये समोरील व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत डॉक्टरचा विश्वास संपादन केला.
मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगची भीती दाखवून वसुली सायबर भामट्यांनी महिला डॉक्टरवर मानसिक दबाव टाकण्यासाठी गंभीर आरोपांची भीती दाखवली. ‘तुमचे आधार कार्ड एका संशयास्पद नंबरला लिंक असून तुम्ही अवैध जाहिरातबाजी आणि अश्लील मेसेजद्वारे पैसे कमवत आहात’, असा बनाव भामट्यांनी रचला. एवढेच नव्हे तर तुमचे नाव मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या गुन्ह्यात आले असून तुम्हाला तात्काळ अटक केली जाईल, अशी धमकी त्यांना देण्यात आली. अटकेची कारवाई टाळायची असल्यास सांगितलेल्या बँक खात्यात पैसे भरावे लागतील अशी धमकी दिल्याने घाबरलेल्या महिला डॉक्टरने भामट्यांच्या खात्यावर ३ लाख रुपये ट्रान्सफर केले.
‘डिजिटल अरेस्ट’चे यापूर्वीचे गंभीर प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून लुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही भामट्यांनी विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो आणि त्यांच्या आवाजाची नक्कल करून एका व्यक्तीला तब्बल १ कोटी ४ लाख रुपयांना लुटले होते. त्या प्रकरणात सायबर सेलने अत्यंत वेगाने कारवाई करत कानपूर आणि इंदूर येथून दोन आरोपींना अटक केली होती.




