नाशिक | Nashik
महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची अधिकृत घोषणा महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकांमध्ये भाजपचे सहा, शिवसेना-मनसे शहर विकास आघाडीचे दोन, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस शहर विकास आघाडीचे दोन सदस्यांचा समावेश आहे.
दरम्यान या घडामोडींनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मोठी कारवाई केली आहे. पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता स्वीकृत नगरसेवकांची परस्पर नावे निश्चित केल्याचा ठपका ठेवत नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी राजीनामा घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, भाजपकडून अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी संभेराव आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ही नावे परस्पर निश्चित केल्याचा आरोप ठेवत भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनील केदारांचा राजीनामा घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे बोलले जाते.
स्वीकृतवरून भाजपमध्ये अंतर्गत वाद चिघळ होता
महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांच्या नियुक्तीवरून गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले होते. एका जागेसाठी अतिरिक्त नाव पुढे करण्याच्या प्रयत्नामुळे हा अंतर्गत वाद अधिक चिघळल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या भूमिकेबाबतही पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले होते. दरम्यान एकीकडे नव्या नगरसेवकांची नावे जाहीर झाली असतानाच, दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या वृत्ताला पक्षाकडून अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
इतर पक्षांकडून स्वीकृतपदी कुणाला संधी?
शिवसेना-मनसे आघाडीकडून विनायक आढाव आणि चंद्रकांत लवटे यांना संधी मिळाली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-काँग्रेस आघाडीकडून हेमंत गायकवाड आणि बाबासाहेब गायकवाड यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.




