पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
टकलेनगर परिसरात आज (शुक्रवार दि. २०) रोजी भरदुपारी एका महाविद्यालयीन युवकाची हत्या (Youth Killed) करण्यात आली. वेदांत संतोष काळे (१८) असे मृत युवकाचे नाव असून, तो पंचवटी महाविद्यालयात (Panchvati College) १२ वी मध्ये शिक्षण घेत होता. जुन्या नाशिक परिसरातील झारकरी कोट परिसरात तो वास्तव्यास होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. टकलेनगर येथील वैशाली अपार्टमेंटजवळील जिजामाता महिला व्यायामशाळेच्या प्रवेशद्वाराजवळ दुपारी २ ते २.३० वाजे दरम्यान ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, मुलीवरून (Girl) झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. सुमारे १० ते १२ जण दुचाकींवरून घटनास्थळी आल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी काहींनी वेदांतवर धारधार शस्त्राने सपासप वार केले. यात त्याच्या छाती व पाटीवर खोलवर जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर संशयितांनी घटनास्थाळाहून पळ काढला.
हे देखील वाचा : Nashik Crime News : दारूचे व्यसन अन् चारित्र्याचा संशय; मोबाईल देण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला संपवलं
घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या वेदांतला तातडीने जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचे वृत्त समजताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, याप्रकरणी पियुष लोखंडे याच्यासह अन्य एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. हल्लेखोरांपैकी एकाने आपली मोपेड घटनास्थळीच सोडून पलायन केले. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचा धागा मिळण्याची शक्यता आहे. तर हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य संशयितांचा शोध सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्य होते का? याचा पोलीस तपास करीत आहेत.




