नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लैंगिक शोषण आणि धमकावल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित अशोक खरात (Ashok Kharat) याच्या जीवाला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणि प्रवासात गंभीर धोका असल्याचा खळबळजनक दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केल्याने खळबळ उडाली आहे. या थ्रेट परसेप्शनमुळे न्यायालयाने तातडीने खरातला पुढील गुन्ह्यात वर्ग करण्याचे आदेश दिले असून, त्याचा ताबा पुन्हा एकदा विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे.
रविवारी (दि. २६) सुटीचे न्यायालय असूनही या प्रकरणातील गांभीर्यामुळे कायदेशीर घडामोडींना वेग आला. सरकारवाडा पोलीस ठाण्यातील (Sarkarwada Police Station) गुन्ह्यात कोठडी संपल्यानंतर खरातला हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, एसआयटीने त्याला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची मागणी केली.
खरातला सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्यक्ष न्यायालयात आणणे कठीण असून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा लागत आहे.तुरुंगात (Jail) आणि प्रवासात खरातवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीच्या तपासातही खरातला सुरक्षेसाठी रात्रभर तुरुंगात ठेवले गेलेले नाही; केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून एसआयटी त्याचा ताबा घेत आली आहे, असा युक्तिवाद अभियोगच्या सहायक संचालक किरण बेंडभर व सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयासमोर (Court) केला.
बचाव पक्षाचा विरोध डावलला
बचाव पक्षाच्या वकिलांनी खरातला न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, सरकारी पक्षाने मांडलेला जीविताला धोका हा मुद्दा न्यायालयाने गंभीरपणे घेतला. अवघ्या अर्ध्या तासाच्या कारागृह प्रक्रियेनंतर खरातला सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी एसआयटीला परवानगी देण्यात आली.
पुढील कारवाईचे पाऊल
माहितीनुसार, एसआयटीने (SIT) रविवारी मध्यरात्रीपर्यंत खरातला नवीन गुन्ह्यात अधिकृतपणे अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचे कळते. त्यानंतर, सोमवारी (दि. २७) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असून, त्यामागे या गुन्ह्यातील अधिक सखोल तपास आणि संभाव्य हल्ल्यांपासून आरोपीचे संरक्षण करणे, असे दुहेरी उद्दिष्ट पोलिसांचे असणार आहे.





