Saturday, September 14, 2024
Homeक्राईमबापानेच केला मोठ्या मुलाचा गळा आवळून खून

बापानेच केला मोठ्या मुलाचा गळा आवळून खून

धाकट्याच्या मदतीने मृतदेह टाकला विहिरीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

घरगुती वादातून बापाने स्वतःच्या मोठ्या मुलाचा गळा दाबून खून केला. धाकट्या मुलाच्या मदतीने त्याचा मृतदेह दगड बांधून बुरूडगाव रस्त्यावरील एकाडे मळ्यात एका विहिरीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 31) समोर आला आहे. 8 मे रोजी ही घटना घडली असून, याप्रकरणी मयत मुलाच्या वडिलांनीच 10 मे रोजी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. आता तब्बल 23 दिवसांनंतर वडिलांनीच त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत विहिरीत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.

गणेश अशोक एकाडे (वय 31, रा. एकाडे मळा) असे मयताचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी त्याचा बाप अशोक लक्ष्मण एकाडे व भाऊ दिनेश अशोक एकाडे या दोघांना ताब्यात घेतले आहे. अशोक एकाडे याने 10 मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन मुलगा गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलीस अंमलदार डाके व वाघमारे याचा तपास करत होते. तपासादरम्यान तक्रारदाराकडून प्रत्येकवेळी दिल्या जाणार्‍या वेगवेगळ्या माहितीमुळे पोलिसांचा अशोकवर संशय बळावला. त्यादृष्टीने पोलीस तपास करत होते.

तसेच, संशयावरून पोलिसांनी परिसरात माहिती घेतली असता, बापानेच त्याच्या मुलाला मारल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार दीपक रोहोकले यांना मिळाली. त्यानंतर मयत गणेशचा बाप अशोक व त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्यानंतर बापानेच मुलाचा खून केल्याचा उलगडा झाला. 8 मे रोजी घराच्या गच्चीवर त्याचा खून केला व धाकट्या भावाच्या मदतीने त्याचा मृतदेह विहिरीत नेऊन टाकल्याचे तपासात समोर आले. मयत गणेश व त्याच्या वडिलांचे कायम वाद होत होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, खुनाचा प्रकार असल्याचे उघड होताच पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी एकाडे मळा येथील विहिरीकडे धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक व महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत मयताचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे निरीक्षक दराडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या