Friday, May 3, 2024
Homeनगरपोलीस दलाची बिनतारी यंत्रणाच चोरट्यांनी लांबविली

पोलीस दलाची बिनतारी यंत्रणाच चोरट्यांनी लांबविली

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या बिनतारी यंत्रणेवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना संगमनेर तालुक्यातील बाळेश्वरच्या डोंगरावर सोमवारी पहाटे घडली आहे.

- Advertisement -

या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळेश्वर येथील धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या मंदिरातील एका खोलीत जिल्हा पोलीस विभागाने उंचावर असलेल्या घारगाव, अकोले, राजूर व पुणे जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील पोलीस ठाण्यांशी विनाअडथळा संपर्क साधण्यासाठी बिनतारी यंत्रणा बसविलेली आहे. या यंत्रणेच्या सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलीस कर्मचारी देखील तैनात आहे. या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत.

असे असताना चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास सर्व कॅमेर्‍यांची तोडफोड करून बिनतारी यंत्रणेचे दोन रिपीटर, तीन चार्जर, इंटरनेट राऊटर, मायक्रोवेव्ह लिंक व अन्य साहित्य असा एकूण 3 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सोमवारी सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर नाशिक बिनतारी संदेश विभागाचे उपअधीक्षक गजानन शेलार, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्यासह घारगावचे प्रभारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, अहमदनगर बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी. ताम्हाणे, घारगावचे पोलीस उपनिरीक्षक डी. पी. राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी नगरहून श्वानपथक तर नाशिकहून ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल उल्हास बढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 39/2021 भारतीय दंड संहिता 457, 380, 427, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या