Saturday, May 9, 2026
HomeनगरCrime News : दोन सराईत गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबध्द

Crime News : दोन सराईत गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबध्द

‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई || पोलिसांच्या प्रस्तावावर जिल्हाधिकार्‍यांची मोहर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील कायदा-सुव्यवस्थेला सतत धोका निर्माण करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांविरूध्द जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलत महाराष्ट्र प्रतिबंधक धोका व्यक्ती अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे. बंटी उर्फ भावेश अशोक राऊत (वय 32, रा. माणिक चौक, लाटे गल्ली, अहिल्यानगर) व प्रताप सुनील भिंगारदिवे (वय 29 रा. सावतानगर, पंपिंग स्टेशन, अहिल्यानगर) अशी कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

- Advertisement -

बंटी राऊत याच्याविरूध्द कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात दरोडा, अत्याचार, घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य, जीवघेणा हल्ला, गावठी कट्टा बाळगणे, धमकी व मारहाण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी ‘एमपीडीए’ अंतर्गत प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे सादर केला. अधीक्षक घार्गे यांनी सदरचा प्रस्ताव बारकाईने तपासून जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे शिफारस केली होती. सखोल पडताळणीअंती जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी बंटी राऊतला ‘एमपीडीए’ अंतर्गत अटक करून नाशिक कारागृहात हलवण्यात आले.

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रताप भिंगारदिवे याच्यावर शरीरविरूध्दचे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात घातक शस्त्रांसह हल्ला, अल्पवयीन मुलीवर लज्जास्पद वर्तन, धमकी, गैरकायद्याची मंडळी जमवणे आदी गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. त्याच्या कृत्यांमुळे भिंगार परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. त्याच्यावर करण्यात आलेल्या प्रतिबंधक उपाययोजना निष्फळ ठरत असल्याने सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी ‘एमपीडीए’ अंतर्गत प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे शिफारस सादर केली. डॉ. आशिया यांनी ती मान्य करून प्रताप भिंगारदिवे यासही नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश दिले.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे व तुषार धाकराव, अंमलदार रवींद्र पांडे, सुरेश माळी, शाहिद शेख, रवींद्र घुंगासे, विशाल तनपुरे, रमिझ आतार, महादेव भांड, शिल्पा कांबळे, राहुल मासाळकर, दीपक शिंदे, रवी टक्कले, संदीप घोडके, प्रमोद लहारे, महादेव पवार, नितीन शिंदे, राहुल गुंड्डू, रेखा पुंड, कविता हरिश्चंद्रे यांच्या पथकाने केली.

जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर नजर ठेवली जाणार असून ‘एमपीडीए’ सारख्या कडक कायद्यांतर्गत कारवाई सुरूच राहणार आहे. वाळू तस्कर, टोळीगिरी करणारे, दहशत पसरवणारे अशा समाजविघातक प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरणार आहे.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक.

ताज्या बातम्या