Thursday, August 20, 2026
HomeनगरAhilyanagar : सायबर फसवणुकीच्या पैशांचे ‘म्युल अकाउंट’धारक रडारवर

Ahilyanagar : सायबर फसवणुकीच्या पैशांचे ‘म्युल अकाउंट’धारक रडारवर

सायबर पोलिसांनी बँकांकडून माहिती मागविली || संशयितांना नोटिसा देण्याची तयारी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

देशभरातील सायबर फसवणुकीच्या रकमा स्वीकारण्यासाठी वापरल्या गेलेल्या ‘म्युल अकाउंट’ प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने पुढे सरकणार असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील 10 संशयित बँक खातेधारकांना लवकरच सायबर पोलिसांकडून चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात येणार आहेत. संबंधित बँकांकडून खातेधारकांची माहिती मागविण्यात आली असून, ती प्राप्त होताच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

- Advertisement -

सायबर पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर शहरासह संगमनेर, शिर्डी, राहुरी, श्रीगोंदा तालुक्यातील 10 बँक खात्यांमध्ये देशभरातील विविध सायबर फसवणूक प्रकरणांतील सुमारे 40 लाख 68 हजार रूपयांची रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम जमा होताच एटीएम किंवा धनादेशाव्दारे तातडीने काढून घेण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, सध्या पोलिसांकडे केवळ संशयित बँक खात्यांचे क्रमांक उपलब्ध असून, त्या खात्यांचे धारक कोण आहेत, याची माहिती संबंधित बँकांकडून मागविण्यात आली आहे. खातेधारकांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावले जाणार असून, व्यवहाराबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती मिळवतात. अशा खात्यांचा वापर फसवणुकीतील पैसे वळविण्यासाठी केला जातो. त्यामुळे अशा प्रकारे स्वतःचे खाते किंवा बँकिंग सुविधा इतरांच्या वापरासाठी देणारी व्यक्तीही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.

आणखी ‘म्युल अकाउंट’चा शोध
सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जिल्ह्यात अशा प्रकारे बँक खाती कमिशनच्या मोबदल्यात उपलब्ध करून देणार्‍यांची संख्या अधिक असू शकते. त्यामुळे प्राप्त झालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आणखी संशयित ‘म्युल अकाउंट’ धारकांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तपासाचा विस्तार होत असल्याने येत्या काही दिवसांत आणखी काही खातेधारकांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफीसाठी 4 हजार कोटी; दुसर्‍या टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दुसर्‍या टप्प्यात 4 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली...