मुंबई । Mumbai
‘सेन्यार’ या विनाशकारी उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळे दक्षिणपूर्व आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून संपूर्ण प्रदेशाला या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दहा वर्षांतील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जात आहे. विशेषतः इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर या वादळाचा सर्वाधिक प्रकोप झाला असून, ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या चक्रीवादळामुळे इंडोनेशिया, थायलंड आणि मलेशियासारख्या देशांमध्ये मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. यंदा मान्सूनच्या काळात उष्णकटिबंधीय वादळांमुळे झालेली अतिवृष्टीने मागील अनेक दशकांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा आणि गंभीर फटका इंडोनेशियाला बसला आहे. सुमात्रा बेटावर परिस्थिती अत्यंत बिकट असून, मृतांचा आकडा ३०० च्या पुढे गेला आहे. इंडोनेशियाच्या आपत्कालीन संस्थेचे प्रमुख सुहार्यंतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही २७९ पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापूर आणि वादळामुळे हजारो घरे वाहून गेली असून, अनेक इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ते तुटल्याने दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वीज आणि इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे प्रशासनाला बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. या संकटातून नागरिकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तब्बल ८० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. प्रशासनाकडून हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य जोरात सुरू आहे.
या चक्रीवादळाने इंडोनेशियासोबतच शेजारील थायलंड आणि मलेशियालाही जोरदार तडाखा दिला आहे. थायलंडमध्ये १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे, मलेशियातही बऱ्याच नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या तीनही देशांमधून लाखो लोक विस्थापित झाले असून, त्यांना तात्पुरत्या निवारागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. या तिन्ही देशांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने मदत पुरवण्याची गरज आहे.




