उद्यापासून बोर्डाच्या परीक्षांचा काळ सुरु होत आहे. या परीक्षांचा ताण मुले आणि त्यांच्या पालकांवरही येतो. परीक्षा-स्पर्धा-भविष्याची दिशा या सगळ्या गदारोळात परीक्षा म्हणजे नेमके काय याचाच विसर पालकांना पडला असावा का? याच विषयावर ‘देशदूत’ने ‘संवाद कट्टा’मध्ये तज्ज्ञांना बोलते केले.
मानसतज्ञ म्हणतात, मुले दैनंदिन आयुष्यात कुठली न कुठली परीक्षा देत असतात. उदाहरणार्थ, नवीन काही शिकणे ही त्यांच्या पातळीवरची परीक्षाच असते. वर्षभर मुलांनी त्या त्या विषयातील माहिती घेतात किंवा शिकतात. त्याचे आकलन करून वेळेवर तो किती आठवू शकतो हे म्हणजेच परीक्षा अशी व्याख्या तज्ञ करतात. तथापि एकूणच व्यवस्थेने आणि विशेषतः पालकांनी परीक्षेची व्याख्या बदलवून टाकलेली आढळते. या परीक्षांना कळत-नकळत जीवनमरणाचा प्रश्न बनवले गेले असावे का? त्याच्या मुळाशी पालकांच्या अवास्तव अपेक्षा, या काळात निर्माण होणारे सामूहिक वातावरण आणि परीक्षेत मिळणार्या गुणांवर ठरवली जाणारी मुलांची हुशारी असू शकेल.
मुलाच्या मनाचा कल, त्याची आवड, आकलनक्षमता यापेक्षा त्याला मिळालेले गुण तो हुशार की मठ्ठ हे ठरवतात. परीक्षेपेक्षा याचाच ताण मुलांवर जास्त येतो. तारतम्य ठेवून ताणाचे नियोजन करणे सर्वाना शिकवले जायला हवे. कारण मुलांवर परीक्षेचा नैसर्गिक ताण असतोच. त्यामुळे या काळात मुलांचे मन शांत राहणे गरजेचे असते. त्यासाठी घरातील वातावरण शांत आणि सामान्य ठेवणे, अर्धा तास मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे घालवण्यास मोकळीक देणे, सतत सूचनांचा भडीमार न करणे आणि कोणालाही करू न देणे, त्यांची झोप पूर्ण आणि शांत होऊ देणे जास्त गरजेचे आहे. मुलांची एकाग्रता क्षमता सुमारे 45 मिनिटांची मानली जाते हेही लक्षात घेतले जायला हवे. तसे झाले तर अभ्यास करतांना मुले अधूनमधून मोकळीक का घेतात हे पालकांना समजू शकेल.
मुलांचा अभ्यास आणि परीक्षा या मुद्यावरून मुलांसमोर एकमेकांना दोषांच्या पिंजर्यात न उभे करण्याची दक्षता पालकांनी घेणे जास्त आवश्यक आहे. तू चिंता करू नको असा आत्मविश्वास पालकांनी मुलांना द्यायला हवा. असे वातावरण मुलांना परीक्षेची मानसिकता तयार होण्यास पोषकच ठरते. हे झाले पालकांचे. या काळात तज्ज्ञ मुलांनाही काही कानमंत्र देतात. ते मुलांनी समजावून घ्यायला हवेत. वर्षभर जे मनापासून शिकणे झाले त्याचेच प्रतिबिंब परीक्षेत उमटते. किती शिकणे झाले हे मुले जाणून असतात. कोणतीही अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया गुणांवर आधारित आहे. त्यामुळे परीक्षा व त्यात मिळणारे गुण महत्वाचे आहेतच. मुलांना त्याची जाणीव पालकांनी निश्चित करून द्यायला हवी. पण त्यांच्या मनाचा कल देखील जाणून घ्यायला हवा. कारण मुले आणि त्यांच्या परीक्षा या दोन वेगळ्या गोष्टी असतात. परिणामी कोणतीही परीक्षा त्यांची जीवनमरणाची ठरू नये इतकीच अपेक्षा.