आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यानंतरचा त्यांचा पहिला दौरा देखील त्यांनी केला आहे. पती निधनाचे दुःख पत्नीला कोलमडून टाकणारेअसते. सुनेत्राताई त्याला अपवाद नाहीत. ही बातमी कळली तेव्हा त्यांचे शब्द जणू मुके झाले होते. दुःखाची परिभाषा व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. हात जोडून अश्रू भरल्या डोळ्यांनी दुःखाला सामोरे जाणाऱ्या त्यांना सर्वांनीच पाहिले. तरीही हा निर्णय त्यांनी का घेतला हे त्यांनीच स्पष्ट केले. डोंगरा एवढे दुःख बाजूला सारून पतीने शिकवलेल्या मूल्यांवर चालायचा निर्णय घेतला आहे अशी भावना त्यांनी पद स्वीकारल्या नंतर व्यक्त केली, ती पुरेशी बोलकी ठरावी. तरीही त्यांच्या निर्णयावर काही काळ मतमतांतरे व्यक्त होत राहातील. अशी परिस्थिती कशी हाताळायची हे त्यांना नक्की माहित असणार. कारण त्यांचा राजकीय वारसा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी. वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील. अजित पवारांशी विवाह करून त्या पवार घराण्यात आल्या. दोन्ही घराणी राजकारणाचा दीर्घ वारसा असणारी. राजकारण-समाजकारण बघत आणि शिकतच त्या मोठ्या झाल्या असणार यात दुमत असू नये. राजकारण नेहमी पुढे येऊनच करावे लागते असे नव्हे. आयुष्यभर राजकारण करणाऱ्या पतीच्या त्या खंद्या पाठीराख्या होत्या. समाजकारण तर त्या करत होत्याच. त्यांच्या पक्षा नेत्यांना आता सक्रिय राजकारणात उतरवले आहे. उपमुख्यमंत्रिपद हे राज्याच्या सत्ताकारणातले दोन क्रमांकाचे पद. ते स्वीकारताना सुनेत्राताईंनी काही तरी विचार नक्कीच केला असणार. सक्रिय पक्ष कारणाचा-सत्ताकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव त्यांना नाही असे बोलले जाते. पण तोटप्पा राजकारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पार पाडावा लागतो. नेते जन्माला येत नाहीत; अनुभवाने घडत जातात असे म्हटले जाते.
सुनेत्रा पवारांची त्या दिशेने पावले पडली असेही मानले जाऊ शकेल. शिवाय यापूर्वीही अशा अचानक पडलेल्या जबाबदाऱ्या अनेकांना स्वीकाराव्या लागल्याची राजकीय उदाहरणेही सांगितली जाऊ शकतील. म्हणजे त्याही बाबतीत राजकीय पक्ष आणि जनतेचा हा काही पहिलाच अनुभव नाही. शिवाय महिलांना राजकारणात संधी देण्यासाठी आरक्षणाची कायदेशीर तरतूद आहे. ते धोरण राजकीय पक्षांनी निदान सकृत दर्शनी तरी स्वीकारले असावे. शिवाय सत्ता प्राप्ती हाच राजकारणाचा अंतिम उद्देशअसतो हे कोणता राजकीय पक्ष नाकारू शकेल? पदाचे महत्व, कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि आव्हाने सुनेत्राताईंना ज्ञात असतील असे गृहीत धरायला हवे. त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतला आहे. त्यांनी संमती दिली आहे. त्यांचा पक्ष आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या मागे उभे आहे असाच त्याचा अर्थ आहे. निवडलेल्या वाटेवर नव्या आशेने चालण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
सत्ताकारण-समाजकारण याबाबतीत त्या नवख्या नाहीत. तेव्हा, आता त्यांना काम करू देणे आणि स्वतःला सिद्ध करू देण्यासाठी वेळ देणे इष्ट राहू शकेल. त्यानंतरच त्यांच्या निर्णयाची मीमांसा केली तर कदाचित ते त्यांना ही मान्य होऊ शकेल. राहाता राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरणाचा. अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर त्यावरून राजकारण रंगले नसते तरच नवल. पक्षप्रमुख मौन असले तरी दोन्ही पक्षांचे नेते क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. खंदे समर्थक त्यात आघाडीवर आहेत. राजकीय विलेषक त्यांची भूमिका मांडत आहेत. सगळे विधी पूर्ण झाल्यानंतरच त्यावर भाष्य करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांना सांगितले आहे.
सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. राजकारण समजणे वेगळे आणि ते करणे-खेळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शिवाय सभ्यता आणि साधन शुचिता ही मूल्ये राजकारणातून जवळपास हद्दपार झाली आहेत वा केली गेलीआहेत. टीका अनेकदा खालच्या पातळीवर घसरते. अवहेलना, प्रतिमाहन न केले जाताना आढळते. समानतेच्या कितीही गप्पा कोणीही मारल्या तरी महिला कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या दबावांचा सामना करावा लागतो हे नाकारले जाऊ शकेल का? सक्रिय राजकारण प्रवेश, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि टक्केटोणपे हाताळणे हेच त्यांचे कदाचित सुनेत्राताईंचे पहिले आव्हान ठरूशकेल. त्याला त्या कशा सामोऱ्या जातात? उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कशी हाताळतात, ते येणारा काळ सांगेलच.




