देश आणि महाराष्ट्राला महापुरुषांची थोर परंपरा आहे. कारण ही भूमी संतांची, समाजसुधारकांची आणि राष्ट्रपुरुषांची आहे. इथल्या कणाकणांत तोच वारसा आहे. म्हणूनच मायभूच्या आरतीला सूर्य, चंद्र आणण्याची भावना कविवर्य सुरेश भट त्यांच्या एका कवितेत व्यक्त करतात. अशा थोर विभूतींच्या जयंती आणि पुण्यतिथी त्यांच्या विचारांची आठवण समाजाला करून देतात. काही दशकानंतरही अशा महान व्यक्तिमत्त्वांचा शोध आणि त्यांच्या कार्याचा बोध अनेक लेखकांना घ्यावासा वाटतो. कारण त्यांचे विचार कालातीत आहेत. त्याच विचारांचा वारसा माणसांनी पुढे चालवायला हवा, असे सगळेच म्हणतात.
राजकीय पक्षांचे धुरिण संधी मिळेल त्या व्यासपीठावरून बेंबीच्या देठापासून सांगत असतात. दिवसाकाठी असा एक तरी कार्यक्रम पार पडतोच. श्रोतेही मान डोलवतात. पण त्यांच्या विचारांवर बोलणे हा बहुसंख्यांचा फक्त अभिनय असू शकेल का? महापुरुषांचे विचार हे घेण्यासारखेच आहेत. मात्र आजही लोकांना याचा विसर पडतो का? त्यांच्या विचाराप्रमाणे काही लोक तसे जगतही असतील. पण अशांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी तरी असू शकेल का? सामान्यतः काय आढळते? राजकीय पक्ष त्यांचे पुतळे बांधतात. व्यासपीठांवर त्यांच्या प्रतिमा लावून त्याचे पूजन करतात. पक्ष, सामाजिक संघटना, मंडळे त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करतात. मिरवणुका काढतात. सगळीकडे महापुरुष अमर रहेच्या घोषणा दिल्या जातात.
पण महापुरुष त्यांच्या विचारांनीच अमर राहू शकतात, याचा मात्र सर्वांनाच विसर पडलेला आढळतो. सगळ्याच महान व्यक्तिमत्त्वांनी जातीभेद-अंधश्रद्धा टाळा असे सांगितले. सामाजिक एकतेवर-शिक्षण प्रसारावर-मानवी मूल्यांवर, मानवतेवर भर दिला. नेहमी सत्य वाचे वदावे, असा उपदेश केला. हे विचार अमलात आणणे सर्वांनाच अंमळ कठीण वाटू शकेल का? कारण समाजात त्यावरच भर दिला जातो हे वास्तव आहे. स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी तेच सोयीचे वाटत असावे का? भेद तर इतके मुरलेले आढळतात की महापुरुषांचीदेखील जातीपातीत वाटणी केलेली आढळते. त्यांची जयंती-पुण्यतिथी साजरी कारण्यासाठीदेखील राजकीय पक्ष आणि लोक एकत्र येताना दिसत नाहीत.
गावोगावी उभारलेले त्यांच्या पुतळ्यांच्या परिसरात फक्त विशिष्ट तिथींनाच स्वच्छता मोहीम राबवली जाते. कविवर्य कुसुमाग्रजांनी त्या अनावस्थेचे वर्णन समर्पक शब्दात त्यांच्या एका कवितेत केले आहे. त्यात ‘माझ्या पाठीशी मात्र, फक्त सरकारी कचेर्यातील भिंती’ असे महात्मा गांधीजींचा पुतळा म्हणतो. तथापि वैचारिकतेच्या वारशाच्या मुद्यावर ती सगळ्याच महापुरुषांची व्यथा ठरू शकेल का?