अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा उद्या सोमवार (दि. 14) रोजी हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी येणार असल्याने यंदाच्या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 14 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार असून, 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला विसर्जन होईल. दरम्यान, नगरमध्ये शनिवारी दुपारपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे एकप्रकारे बाप्पांच्या स्वागतासाठी वरूणराज सज्ज झाल्याचे दिसत आहे.
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात उद्या (सोमवारी) लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. यंदाचा गणेशोत्सव दहा नव्हे, तर तब्बल 12 दिवसांचा होणार असून 2017 नंतर पुन्हा हा योग जुळून आला आहे. उद्या 14 सप्टेंबर रोजी सूर्योदयाच्या वेळी हरतालिका तृतीया असेल. सकाळी 7.07 वाजता तृतीया समाप्त होऊन त्यानंतर चतुर्थी सुरू होईल. गणेश चतुर्थीची तिथी मध्याकाळात येत असल्याने दोन्ही व्रते एकाच दिवशी आली आहेत. हरितालिका व गणेश चतुर्थीचे कर्ते वेगवेगळे असल्याने दोन्ही पूजांच्या वेळेबाबत भाविकांनी संभ्रम बाळगण्याची गरज नाही. तृतीया समाप्त होण्यापूर्वी किंवा त्यानंतरही हरतालिका पूजन करता येईल. तसेच सकाळपासून मध्यान्हापर्यंत गणेशपूजनही करता येणार आहे.
यंदा तृतीया आणि चतुर्थीच्या तिथींमध्ये क्षय किंवा वृद्धी नसल्याने गणेशोत्सवाचा कालावधी 12 दिवसांचा झाला आहे. यापूर्वी 2017 मध्ये अशाच प्रकारे 12 दिवसांचा गणेशोत्सव झाला होता. तसेच हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येण्याचा योग 2006 आणि 2009 मध्ये आला होता. हरितालिकेचा उपवास 14 सप्टेंबर रोजी करून 15 सप्टेंबरला पारणे सोडावे. ऋषिपंचमीचे व्रत असणार्यांनी 15 सप्टेंबरला सकाळी हरितालिकेची उत्तरपूजा करून त्यानंतर उपवास सोडता येणार आहे. गेल्या सव्वा महिन्यांपासून नगर जिल्ह्यात पावसाचा खंड होता.
मात्र, शनिवार दुपारपासून पावसाला सुरूवात झाली असून यंदा गणपती बाप्पांसोबत जिल्ह्यात पावसाचे आगमन होणार आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत गणेशोत्सवासाठी बाप्पांच्या घरगुती व सावर्जनिक मुर्त्या, आवश्यक सजावट साहित्य, पूजा साहित्य, वीजेचे उपकरण यांच्यासह फुलांची बाजारपेठेत सज्ज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने बाजारपेठेत उत्साह दिसत नव्हता. मात्र, पावसाला सुरूवात झाल्याने सर्वांचा उत्साह वाढून गणेशोत्सावाची रंगत वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.




