Wednesday, January 7, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ७ ऑगस्ट २०२५ - मरणात जग जगते..

संपादकीय : ७ ऑगस्ट २०२५ – मरणात जग जगते..

राज्यात अवयवदान पंधरवडा साजरा होत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी अवयवदानाचा अर्ज भरून त्याची सुरुवात केली. यानिमित्त ‘अंगदान : जीवन संजीवनी अभियान’ वर्षभर राबवले जात आहे. अवयवदान सुलभ व्हावे म्हणून केंद्र सरकारने २०२३ साली ‘नॅशनल ऑर्गन अ‍ॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ची वेबसाईट सुरू केली. त्यावर सुमारे साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी अवयवदान प्रतिज्ञा केली. २०२४ मध्ये भारतात एकूण सुमारे एकोणीस हजारांहून अधिक अवयव प्रत्यारोपण पार पडले. याबाबतीत भारत जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे.

अवयवदान हे खरेच गरजूंच्या आयुष्यासाठी संजीवनी ठरू शकते. कारण अवयव निकामी किंवा अकार्यक्षम झालेल्या व्यक्तींचे आयुष्य वेदनांनी भरलेले असते. त्याची छाया त्यांच्या कुटुंबावरदेखील पडते. अवयवाअभावी कुटुंबातील सदस्याचे आयुष्य एक एक दिवसाने कमी झालेले फक्त बघत राहणे त्यांच्यासाठी किती त्रासदायक असू शकते याची कल्पना करणेसुद्धा किती जणांना शय होऊ शकेल? अवयवदानाची प्रतीक्षा करणेच त्यांच्या नशिबी असते. ही उणीव अवयवदानाने भरून निघणारी असते. तरीही गरजूंच्या तुलनेत दात्यांची संख्या कमीच आढळते. भारतात त्याचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.

- Advertisement -

आजमितीला देशात सुमारे त्रेसष्ट हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना तर राज्यात सुमारे सात हजारांपेक्षा जास्त लोकांना मूत्रपिंड तर बावीस हजारांपेक्षा जास्त जणांना यकृत प्रत्यारोपणाची गरज आहे. ही माहिती आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या कार्यवाहक सचिवांनी नुकतीच दिली. यावरून अन्य अवयवयांच्या प्रतीक्षा यादीची कल्पना येऊ शकेल. त्या तुलनेत दात्यांची संख्या का वाढत नसावी? वास्तविक भारतीय संस्कृतीत दानाचे अपरंपार महत्त्व सांगितले आहे. ते मुलांच्या मनावर ठसवण्यासाठी त्यांना गोष्टी सांगितल्या जातात. अवयवदान हे तर जीवनदानच मानले जाते. तरी लोक तयार का होत नसावेत? सरकारने यावर विचार केलेला असू शकेल.

YouTube video player

अवयवदान प्रक्रियेविषयी लोकांना फारशी माहिती आढळत नाही. अवयवदान कोणी, कधी आणि कुठे करायचे, त्याची पद्धती याविषयी सामान्य माणसे अनभिज्ञ असतात. परिणामी ती खूप किचकट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, असा लोकांचा भ्रम आढळतो. आप्ताच्या मृत्यूने त्याचे कुटुंबीय भावनिकदृष्ट्या कोलमडलेले असतात. त्याचे पार्थिव व त्यावरचे अग्निसंस्कार हा त्यांच्यासाठी संवेदनशील विषय असतो. अवयवदान केल्यास पार्थिव विद्रुप होईल, अशी भीती त्यांना वाटणे स्वाभाविकच आहे. शिवाय अवयव काढून विकले जातात अशी त्यांची भावना आढळते. विविध मालिका आणि सिनेमांमुळे ती पोसली जाते. याशिवाय, अन्यही काही कारणे संभवतात. त्यामुळे अवयवदान नकोच अशीच धारणा मोठ्या प्रमाणात नसती तरच नवल.

वास्तविक मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या दोन्ही किडण्या, यकृत, स्वादुपिंड, फुफ्फुस, हृदय, आतडे, डोळे आणि टिश्यू अशा अवयवांचे दान केले जाऊ शकते. जे गरजूंच्या आयुष्यात नवी पहाट फुलवू शकते. असे घडण्यासाठी सरकारचा सातत्यपूर्ण पुढाकार आवश्यक आहे. उपरोक्त उणिवा दूर करण्याला सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. त्याचा एक मार्ग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या एका भाषणात सांगितला होता. यासाठी वैद्यकीय क्षेत्राने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सुचवले होते. डॉटरांना लोक जीवनदाता मानतात. डॉटरांवर रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांचा विश्वास असतो. डॉटर सांगतील ते लोकांना पटते. त्यामुळे अवयवदानाचे महत्त्व, त्याविषयीचे गैरसमज आणि गरज याविषयी डॉटरांनी सांगितले तर लोकजागरुकता निर्माण होण्यास त्याचा हातभारच लागेल.

अवयवदानाचे महत्त्व पटले तरच लोक अवयवदान करण्यास कदाचित तयार होऊ शकतील. याशिवाय सामाजिक संस्थांना हे आव्हान पेलावे लागेल. अनेक संस्था स्वयंस्फूर्तीने काम करतात. जिवंतपणी अवयवदान करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना केंद्र सरकार बेचाळीस दिवसांची विशेष रजा देते. याशिवाय अवयवदानाची सर्वसामान्य माहिती, सामाजिक कार्यकर्त्यांची नावे आणि संपर्क क्रमांक, सरकारी वेबसाईट, प्रक्रियेच्या पायर्‍या देणारे फलक सरकारी रुग्णालयात लावणे हेदेखील एक मार्ग असू शकतात. अवयवदानास प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. त्याला बळ देणे हे सुजाण नागरिकांचेदेखील कर्तव्य आहे. कारण एखाद्याचे मरणदेखील त्यामुळे सार्थक ठरू शकते. ‘मरणात खरोखर जग जगते’ हेच खरे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...