Friday, April 25, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : ९ एप्रिल २०२५ - सुट्टी, पुस्तक परिचयाची संधी

संपादकीय : ९ एप्रिल २०२५ – सुट्टी, पुस्तक परिचयाची संधी

उन्हाचा पारा चढता आहे आणि अशा काळात मुलांची सुट्टी म्हणजे डोक्याला ताप, अशीच बहुसंख्य पालकांची भावना असू शकेल. भर उन्हात खेळून मुलांनी आजारी पडू नये हीच चिंता त्यामागे असणार. सुट्टीचा एक उपयोग मुलांना वाचनाशी मैत्र जोडून देण्यासाठी केला जाऊ शकेल. एरवीही मुले अवांतर फारसे काही वाचत नाहीत अशी पालकांचीच तक्रार असते. तिचे काहीसे निराकरण करण्याची संधी सुट्टी त्यांना मिळवून देऊ शकेल.

मुलांच्या सर्वांगीण विकासात वाचन किती महत्त्वाची भूमिका बजावते हे आता सारेच जाणून असतील. वाचन सवयी रुजवण्याचे प्रयत्न करणारे व्यक्ती आणि त्यांचे समूह अवतीभवती आढळतात. ‘मुंबई बुकीज’ हा उप्रक्रम शंतनू नायडू, गार्गी सांडू आणि त्यांच्या काही मित्रांनी सुरू केला आहे. मुंबईतील पुस्तकप्रेमी दर आठवड्याला एका बागेत जमतात. शांतपणे वाचतात. सुमारे साडेतीनशे वाचक याच्याशी जोडले गेले आहेत. ‘मेक इंडिया रीड’ हे अमृत देशमुख यांचे स्वप्न आहे. बुकलेट नावाचे अ‍ॅप त्यांनी तयार केले आहे. देशमुख विविध भाषांमध्ये पुस्तके वाचतात. त्याचा लेखी सारांश, त्याची ध्वनिफित ते या अ‍ॅपवर टाकतात आणि वाचकांना त्या पुस्तकाची ओळख करून देतात.

- Advertisement -

नाशिक-ओझर रस्त्यावर एक आजी पुस्तकांचे हॉटेल चालवतात. म्हणजे लोकांना तिथे विविध खाद्यपदार्थांबरोबच पुस्तकेदेखील वाचायला उपलब्ध करून दिली जातात. विनायक रानडे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रम चालवतात. ज्याचा विस्तार देश-विदेशात झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील लोहोणेर गावातील एका शाळेत मुलांनी पुस्तकांची गुढी उभारली. त्यानिमित्त पुस्तके हाताळली. समाज माध्यमांवर वाचनप्रेमींचे अनेक समूह आढळतात. ही उदाहरणे युवा अजूनही वाचन करतात हा आशावाद जिवंत ठेवणारी ठरू शकतील. अर्थात वाचन संस्कार रुजवणे तसे सोपे नाही. त्यासाठी अशा अभिनव पद्धती शोधल्या जाणे जसे आवश्यक आहे तद्वतच वाचन सवयीकडे बघण्यचा दृष्टिकोनदेखील व्यापक होणे गरजेचे आहे.

सुट्टीत पुस्तक प्रदर्शनांना भेटी हा मुलांना कोणत्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये रुची आहे हे जाणून घेण्याचा एक मार्ग आहे. अमूकच वाचा आणि अमूक एका पद्धतीनेच वाचा असा आग्रह धरण्यापेक्षा त्यांना त्यांची पुस्तके निवडू दिली गेली तर वाचनाच्या दिशेने ते पहिले पाऊल ठरू शकेल. ठकठक, चंपक, चांदोबा किंवा किशोर अशा रंगीबेरंगी पुस्तकांनी आणि मासिकांनी माणसांच्या काही पिढ्या वाचत्या केल्या. पुस्तक हातात घेतले म्हणजे ते पूर्ण केलेच पाहिजे हा आग्रह किंवा अट्टाहास त्यांना वाचन परावृत्त करू शकेल.

सुट्टीत पुस्तके चाळायला शिकली तर उद्या वाचायला शिकू शकतील. मुले मोबाईल हाताळतात. हा चिंतेचा विषय बनला आहे. तथापि वाचनासाठी त्याचा फायदा करून घेतला जाऊ शकेल. कारण समाज माध्यमांवरदेखील युवा वाचन करतात. अनेक अ‍ॅप त्यासाठी उपलब्ध आहेत. त्याची तोंडओळख मुलांना करून दिली जाऊ शकेल. समाज माध्यमांवर ऑडिओ बुक हा प्रकार लोकप्रिय आहे. त्यात अनेक लेखक त्यांचे पुस्तक वाचतात जे वाचक ऐकतात. हेही एकप्रकारचे वाचनच नाही का? मुलांना वाचनाची सवय लावणे हे चिकाटीचे काम आहे हे खरे, पण त्यासाठी सुट्टीचा मात्र उत्तम वापर केला जाऊ शकेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...