Thursday, May 14, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १ एप्रिल २०२६ - संघर्षाकडून शांततेकडे…

संपादकीय : १ एप्रिल २०२६ – संघर्षाकडून शांततेकडे…

भारतीय लोकशाहीच्या प्रवासात अंतर्गत सुरक्षेपुढील सर्वात भीषण, क्रूर आणि रक्तपाती आव्हान म्हणून ओळखला जाणारा नक्षलवाद आता अंताच्या उंबरठ्यावर उभा आहे. एकेकाळी पशुपतीपासून तिरुपतीपर्यंत पसरलेला हा लाल आतंकवादाचा कॉरिडॉर आता केवळ मोजक्या जिल्ह्यांत आणि काही डझन सक्रिय नक्षलवाद्यांपुरता मर्यादित राहिला आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलमुक्त करण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेली घोषणा ही केवळ राजकीय गर्जना नसून, ती गेल्या अनेक दशकांतील हजारो निरपराध नागरिकांच्या आणि जवानांच्या बलिदानानंतर उगवलेली शांततेची नवी पहाट आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरु नये.

- Advertisement -

हा विजय केवळ बंदुकांच्या जोरावर मिळालेला नाही तर तो विकास, विश्वास आणि राजनैतिक इच्छाशक्तीच्या त्रिवेणी संगमातून साकारला आहे. नक्षलवादाने देशाला प्रगतीच्या मार्गापासून रोखण्यासाठी जे अडथळे निर्माण केले होते, ते आता इतिहासजमा होत आहेत. छत्तीसगडचा बस्तर विभाग आणि महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा, जे एकेकाळी नक्षलवाद्यांचे अभेद्य बालेकिल्ले मानले जात, तिथे आज चित्र पूर्णपणे पालटले आहे. दशकानुदशके जिथे दहशतीचे आणि बंदुकीचे राज्य होते, तिथे आता पहाटेच्या वेळी गोळ्यांच्या आवाजाऐवजी शाळांच्या घंटांचा नाद घुमत आहे. नक्षलवाद्यांनी नेहमीच दुर्गम भागातील रस्ते, पूल आणि वीज प्रकल्पांना सुरुंग लावून विकासाला विरोध केला, कारण अज्ञान आणि गरिबी हेच त्यांच्या हिंसक विचारधारेचे कच्चे रक्षण होते.

मात्र, आज रेशन दुकाने, सुसज्ज रुग्णालये आणि सरकारी कल्याणकारी योजना आदिवासींच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेली विकासगंगा मोहीम आणि गडचिरोलीत सुरू झालेले मोठे लोहखनिज प्रकल्प या परिवर्तनाचा कणा ठरले आहेत. ज्या हातांमध्ये एकेकाळी नक्षलवाद्यांनी बळजबरीने शस्त्रे दिली होती, तेच हात आता कारखान्यांमध्ये आणि शेतात विकासाची अवजारे धरून नव्या भारताची स्वप्ने विणत आहेत. स्थानिक तरुणांना मिळालेला सन्मानजनक रोजगार हाच नक्षलवादाच्या मुळावर बसलेला सर्वात मोठा घाव आहे. या दीर्घकालीन लढाईत भारतीय सुरक्षा दलांचे, विशेषतः महाराष्ट्रातील सी-६० सारख्या उच्चभ्रू कमांडो तुकड्यांचे शौर्य जागतिक दर्जाचे आणि अतुलनीय ठरले. घनदाट जंगलात, दलदलीत आणि दुर्गम डोंगरदर्‍यात आपल्या प्राणाची पर्वा न करता लढणार्‍या या जवानांमुळेच नक्षलवाद्यांच्या ३० एरिया कमिट्यांची संख्या आता अवघ्या ५ वर येऊन ठेपली आहे. गणपती, मिशिर बेसरासारखे मोठे नक्षलवादी नेते आज तुरुंगात आहेत, फरार आहेत किंवा शरणागती पत्करण्याच्या मार्गावर आहेत. सुरक्षा यंत्रणांनी केवळ शत्रूचा खात्मा केला नाही, तर रूरल पार्टी कमिटीसारख्या छुप्या समर्थकांना आणि शहरी भागातील विचारवंतांच्या नावाखाली दहशतवादाचे समर्थन करणार्‍यांनाही कायद्याच्या चौकटीत आणण्याचे काम केले.

आज नक्षलवाद्यांची गुप्तचर यंत्रणा खिळखिळी झाली असून, जनतेने आता हिंसेचा मार्ग नाकारून संविधानाचा रस्ता धरला आहे. वैचारिक दृष्टिकोनातून पाहिले तर नक्षलवाद हा केवळ गरिबीतून किंवा शोषणातून जन्मलेला स्थानिक प्रश्न नव्हता. तो माओ त्से तुंग यांच्यासारख्या परदेशी विचारवंतांच्या सत्ता बंदुकीच्या नळीतून येते. या हिंसक सूत्राने प्रेरित होऊन भारतीय संसदीय लोकशाहीला दिलेले एक सशस्त्र आव्हान होते. संसदेत काही नेत्यांकडून नक्षलवाद्यांची तुलना भगतसिंग किंवा बिरसा मुंडा यांच्यासारख्या महान राष्ट्रनायकांशी करण्याचा प्रयत्न होणे हे ऐतिहासिकदृष्ट्या केवळ चुकीचे नसून, ते स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणारेही आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी परकीय सत्तेविरुद्ध लढा देऊन देशाला स्वराज्य मिळवून दिले, तर नक्षलवाद्यांनी स्वतःच्याच देशाच्या संविधानाविरुद्ध, तिरंग्याविरुद्ध आणि गरिबांविरुद्ध युद्ध पुकारले होते. या वैचारिक संघर्षात आता लोकशाही मूल्यांचा विजय झाला असून, अन्यायाचे समाधान हिंसेत नसून संविधानाने दिलेल्या अधिकारात आहे, हे आदिवासी समाजाने जगाला दाखवून दिले आहे.

आगामी काळात भारत नक्षलवाद मुक्तीच्या अंतिम आणि निर्णायक टप्प्यात असताना काही महत्त्वाच्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करणे अनिवार्य आहे. नक्षलवाद संपला तरी तो पुन्हा डोके वर काढणार नाही, यासाठी दुर्गम भागात रस्ते आणि संपर्काचे जाळे घट्ट करणे, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि नक्षली विचारांचा छुपा प्रसार रोखण्यासाठी डेटा-आधारित आधुनिक तांत्रिक टूल्सचा वापर करणे, जे नक्षलवादी भरकटले होते, त्यांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी पुनर्वसन धोरण राबवणे हाच या विजयाचा कळस असेल. ३१ मार्च २०२६ ची ऐतिहासिक मुदत गाठताना भारताने लाल आतंक कायमचा गाडून विकासाचा भगवा आणि तिरंगा झेंडा अभिमानाने फडकवला पाहिजे. नक्षलवादाचा हा मावळता सूर्य भारतीय लोकशाहीच्या अढळ विश्वासाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. दहशतीच्या सावटातून मुक्त होऊन जंगलातील शेवटचा नागरिक जेव्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होईल, तेव्हाच खर्‍या अर्थाने समर्थ भारताची पहाट होईल. हा विजय बुलेटवर बॅलेटने मिळवलेला लोकशाहीचा महाविजय आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...