Tuesday, January 6, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १ जानेवारी २०२६ - जय भारत देशा..

संपादकीय : १ जानेवारी २०२६ – जय भारत देशा..

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. ‘झाले मोकळे आकाश’ असे म्हणत लोकही उत्साहात नव्या वर्षाचे स्वागत करतील. सामान्य लोकही ‘देश’ म्हणून विचार करतात, ही गेल्या सरत्या वर्षाची सर्वात मोठी उपलब्धी आहे. सामान्य लोकांना सर्वच क्षेत्रातील माहिती असणे अपेक्षितच नसते. तरीही त्या त्या क्षेत्रातील प्रगतीचा लोकांना देश म्हणून अभिमान वाटतो. विविध देश जेव्हा देशाच्या पंतप्रधानांसहित इतर व्यक्तिमत्वांचे ‘रेड कार्पेट’ टाकून स्वागत करतात, तेव्हा सामान्य माणसे देखील अभिमानाने फुलून जातात. या निमित्ताने का होईना निर्माण झालेली राष्ट्रीयत्वाची आणि एकात्मतेची भावना कोणत्याही परिस्थितीत देश एकसंघ ठेवण्यास आवश्यक असते.

- Advertisement -

कारण लोक म्हणजेच देश हे आता लोकांनाही पटले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा अधिकाधिक बळकट आणि उज्वल होत चालली आहे. भारताची दखल घेतल्याशिवाय स्वतंत्रपणे आंतरराष्ट्रीय राजकारण करता येणार नाही हे जगालाही आता मान्य करावे लागले आहे. देश म्हणून मागे वळून पाहताना देशाने विविध क्षेत्रात केलेली प्रगती डोळ्यात भरते. याची वानगीदाखलची उदाहरणे पाहिली तरी त्याची कल्पना येईल. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख अपरिहार्य आहे. अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. इस्रोने सोडलेल्या नव्या वजनदार उपग्रहाने जागतिक संपर्काचा नवा अध्याय सुरू केला. देशांतर्गत कोणत्याही परिस्थितीत, नैसर्गिक आपत्तीत मोबाईलवर संपर्क साधणे यामुळे शय होणार आहे.

YouTube video player

क्रीडा क्षेत्रात महिलांनी गाजवलेल्या पराक्रमाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे. अंध महिलांच्या संघाने देखील पहिला जागतिक चषक भारताच्या नावे केला. देशातील पहिली कार्बन डाय ऑक्साईडची विहीर आयआयटी मुंबई आणि एनटीपीसी यांच्या संशोधकांनी तयार केली. देशात दोन लाखांच्या पुढे स्टार्टअप यशस्वीपणे कार्यरत आहेत. ज्यामुळे सुमारे एकवीस लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण केले. अशा मैलाच्या दगडांची यादी मोठी होईल. अनेक आव्हाने आहेतच. ती पेलणे हे लोकांनी सत्ता सोपवलेल्या सरकारचे काम आहे. त्याला लोक त्यांच्या परीने साथ देऊ शकतील. वैयत्तिक आरोग्य, सामाजिक भान, माणुसकीचे बंध अशा अनेक मूल्यांवर लोकांना वैयक्तिक पातळीवर बरेच काम करणे गरजेचे आहे. देशांतर्गत स्थिर आणि शांत वातावरण देशाच्या जागतिक प्रगतीसाठी मोलाची भूमिका बजावते. त्यातील काही मुद्यांचा परामर्श घेतला जाऊ शकेल.

उदाहरणार्थ, वैयक्तिक आरोग्याच्या पातळीवर कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह अशा अनेक दीर्घ व्याधींचा विळखा युवा पिढीला देखील ग्रासत आहे. जागतिक आणि देशांतर्गत अनेक सर्वेक्षणे तो धोका अधिक ठळक करतात. त्याच्याशी सामना करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना राबवल्या जातातच. पण त्यांची मदत घेण्याची वेळ येऊ न देणे लोकांच्या हातात आहे. अनारोग्य आणि आरोग्यासंदर्भात जागरूक होणे ही मुख्यत्वे लोकांची जबाबदारी आहे. सवयींमधील छोटे छोटे बदल वैयक्तिक आरोग्याचा मार्ग नव्या वर्षात प्रशस्त करू शकतील. अडनिड्या वयाच्या मुलांमधील वाढती हिंसा आणि आक्रमकता हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. त्याचे एक मूळ पालकत्वात सापडते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आणि समाजमाध्यमांचा प्रभाव याने पालकत्वापुढे आव्हाने निर्माण केली आहेत हे खरे पण सुजाण पालकत्व त्यावर प्रभावी मार्ग शोधू शकेल. प्रशिक्षणाने सुजाण पालकत्व काही प्रमाणात अंगी बाणवणे शय होऊ शकेल. जागरूकता समाजाला सामाजिक भेदाभेदांपासून दूर ठेवू शकेल.

विविध पातळ्यांवरील भेदाभेदांमुळे समाज विघटनाच्या उंबरठ्यावर उभा राहू शकेल हे समाजातील कटू वास्तव आहे. हेच भेद देशाला एकसंघ ठेवण्यातील मोठाच अडथळा ठरतात. त्यांना थारा न देणे आपल्या हाती आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात कुठल्या ना कुठल्या निवडणुका होतच असतात. राजकीय पेचडावपेच, कुरघोड्या आणि कोलांटउड्यांना लोक चांगलेच वैतागले असतील तर त्यात नवल नाही. जागरूकतेने केलेले मतदान हा त्यावरचा व्यवहार्य उपाय आहे. सर्व बाबतीत गृहीत धरणार्‍या राजकारण्यांना लोकच मतदानातून धडा शिकवू शकतील याची खूणगाठ लोक नवीन वर्षात बांधू शकतील. ‘पावसाळे जास्त पाहिले’ अशी म्हण सहजपणे वापरली जाते. त्याचा अर्थ समंजसपणा, तारतम्य, तर्कशक्ती आणि बुद्धीही विकसित होणे. जास्त पावसाळे पाहण्याबरोबरच नवीन वर्षात ही सगळी मूल्ये विकसित होतीलच. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

ताज्या बातम्या