वीस-वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांचा विश्वचषक रविवारी रात्री भारतीय खेळाडूंनी उंचावला. तेव्हा प्रत्येक देशवासीयाला आपण स्वत:च विश्वविजेते बनल्याचा आनंद झाला असल्यास नवल नाही. आपल्या देशात या खेळावर लोक प्रेमच इतके करतात, की त्याला थेट फीव्हरच म्हटले जाते. त्यामुळे लागोपाठ दुसर्यांदा या प्रकारातील विश्वचषक जिंकण्याचा आनंद होणे साहजिकच म्हणावे लागेल. जगभरात मर्यादित विस्तार असल्याचा काही टीकाकारांतर्फे घेतला जाणारा आक्षेप मान्य करूनही या खेळात भारत एक मोठी शक्ती म्हणून पुढे आला असल्याचे या विजयाने दाखवून दिले आहे. प्रत्येकी वीस षटकांच्या या क्रिकेटने हा खेळ रंगतदार आणि रंजक केला आहे.
महिनाभर चाललेल्या या संपूर्ण स्पर्धेत आपण केवळ एक सामना गमावला यावरून क्रिकेटच्या या सुधारीत आवृत्तीत भारताने आपला किती मोठा दबदबा निर्माण केला आहे याचा प्रत्यय येतो. विशेष म्हणजे, काही भरवशाचे फलंदाज आणि गोलंदाजांना त्यांच्या क्षमतेनुरूप खेळ करता आला नाही, तरीही अव्वल आठ साखळीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना वगळता प्रतिस्पर्ध्यांना भारतीय संघाने जराही डोके वर काढू दिले नाही. यामागे सांघिक कामगिरी हे कारण होतेच; मात्र तरीही काही खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचा उल्लेख न करणे त्यांच्यावर अन्यायकारक होईल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या केरळच्या संजू सॅमसनने अव्वल साखळीतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासह उपांत्य व अंतिम सामन्यात जबाबदारी ओळखून केलेली फलंदाजी अविस्मरणीय आहे.
संजू हा एक पर्यायी यष्टीरक्षक-फलंदाज असल्याची त्याची आतापर्यंतची ओळख होती. मात्र, लागोपाठ तीन सामन्यांत संघाच्या धावसंख्येत त्याचे सर्वाधिक योगदान पाहिल्यानंतर, खेळातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातही सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी योग्य वेळ निवडावी लागते, असे म्हणता येईल. तशी संजूने केलीच; मात्र भल्याभल्या गोलंदाजांची चौफेर धुलाई करतानाही न बदललेली त्याची शारीर बोली पाहता त्याच्यासारख्या खेळाडूंमुळेच सभ्य लोकांचा खेळ असा क्रिकेटचा लौकिक अद्याप टिकून आहे, असे म्हणता येईल. दुसरीकडे, अर्शदीपने डॅरिल मिचेलला चेंडू फेकून मारल्याने असभ्यपणाचे दुर्दैवी दर्शन घडले. स्पर्धेच्या नंतरच्या टप्प्यात संघात आलेल्या ईशान किशननेही संधीचे असेच चीज केले.
अंतिम सामन्यात अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर संघाची गरज ओळखून त्याने केलेल्या फलंदाजीपेक्षाही त्याचे झेल संघाला विजेतेपदाकडे नेण्यास जास्त कारणीभूत ठरले. उपांत्य सामन्यात तीन अफलातून झेल ईशानने टिपल्याने सामन्याला निर्णायक वळण मिळाले. अन्यथा, सामना शेवटाकडे नेण्याची क्षमता किवींकडे होती हे नाकारून चालणार नाही. जसप्रीत बुमरा ही राष्ट्रीय ठेव आहे, असे कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणतो, तेव्हा बुमराबद्दल बोलण्यास फार काही उरत नाही. निवडक सामने खेळण्याच्या त्याच्या निर्णयावर मागे टीका झाली होती; परंतु जेव्हा केव्हा तो खेळतो, तेव्हा भारतीय जनतेची, ‘घेता किती घ्याल दो करांनी’ अशी स्थिती होते. फलंदाजीचे नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर चार षटकात अवघ्या पंधरा धावा देऊन त्याने चार बळी घेतले. ग्रेट !! २०२४ चा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेच्या हातातून त्यानेच खेचला आणि आता दोन वर्षांनंतर न्यूझीलंडला त्याने तेवढी मजलच मारू दिली नाही.
हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, तिलक वर्मा, अर्शदीप हे एखाद दुसर्या सामन्यातील अपयश पुढील सामन्यांमध्ये धुवून काढतात. ‘बसवा, बसवा’, अशी जवळपास राष्ट्रीय मागणी असलेल्या अभिषेकने मागील अपयशाचा सव्याज वचपा काढला. त्याच्या १८ चेंडूंतील अर्धशतकाने मधल्या फळीच्या अपयशावर आगाऊच पांघरूण घातले. लागोपाठ दोन स्पर्धांचे विजेतेपद, मायदेशात प्रथमच विजेतेपद मिळवणारा संघ यासारखे काही विक्रम भारताने या सामन्याच्या निकालातून नोंदवले आहेत. यंदाच्या विश्वचषकात जगातील वीस संघ सहभागी झाले. नेदरलँड्स, स्कॉटलंड, नेपाळ, अफगाणिस्तान यासारखे संघ कथित ताकदवान संघांशी झुंज देण्याची हिंमत दाखवू लागले आहेत. भारतीय लोकांचा जीव की प्राण असलेला हा खेळ खर्या अर्थाने जागतिक स्वरूपाचा होण्याची सुचिन्हे यातून दिसू लागली आहेत. कोणत्याही खेळाच्या विकासासाठी हे बदल आवश्यक असतात. ते होत असताना भारताचा प्रभाव वाढतो आहे, हे आणखी एक शुभचिन्ह.




