आठ वर्षांचा दुष्काळ संपवत भारताच्या हॉकी संघाने आशिया चषकावर आपले नाव कोरले. दमदार दावेदार मानल्या जाणार्या दक्षिण कोरिया संघाला चार-एक अशी मात देऊन मैदान गाजवले. गतवर्षीचा तो विजेता आहे. भारतीय हॉकी यावर्षी शतक महोत्सव (शंभर वर्षे) साजरा करीत आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील विजयाचे वेगळे महत्त्व आहे. या विजयाने २०२६ मध्ये होणार्या विश्वचषकासाठी भारताचा संघ थेट पात्र ठरला आहे. त्यामुळे खेळाडूंसह त्यांचे चाहते विशेष आनंदात आहेत.
अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी दक्षिण कोरियावर विलक्षण दडपण आणले आणि दमदार खेळी करीत ते कायमही राखले. दिलप्रीत नसिंह ‘सामनावीर’ ठरला. त्याचे वडील बलविंदर हेदेखील आर्मीसाठी हॉकी खेळायचे हे विशेष! देशात आणि राज्यात निवडणुकांची चर्चा असली तर गेले दिवस दोन खेळांमधील विजयाचे आहेत. भारताच्या कंपाउंड तिरंदाजी संघाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिले सुवर्णपदक तर मिश्र संघाने रौप्यपदक पटकावले. १९९५ सालापासून भारतीय खेळाडू या विजयाच्या प्रतीक्षेत होते. तो दुष्काळ त्यांनी यावर्षी संपवला आहे. असे विजय आवश्यक असतात. त्या खेळांना ते लक्षवेधी बनवतात. लोकांचाही त्या खेळांकडे ओढा वाढतो. मुलांनी खेळात भविष्य बनवावे, अशा भावना व्यापक स्तरावर निर्माण होण्यास असे विजय मदत करतात.
केवळ हॉकीच नव्हे तर भारत सर्व प्रकारच्या खेळांतील गुणी खेळाडूंची खाण आहे. अत्यंत विपरित परिस्थितीवर मात करून खेळाडू त्यांची जागा निर्माण करतात. इतरांच्या मनात स्वप्ने जागवतात. हॉकी संघातील अनेक खेळाडू त्याचे चपखल उदाहरण ठरू शकेल. कृष्ण पाठक हा संघाचा गोलकिपर आहे. त्याच्या लहानपणीच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. आपण अनाथ आहोत, हॉकीमुळे जीवन संपन्न झाले, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने जालंधरमधील सुरजीत हॉकी अकादमीतून खेळाची सुरुवात केली. अभिषेक नैन हा वयाच्या नवव्या वर्षापासून हॉकी खेळतो. ‘तू सारखा जखमी होतोस. हॉकी खेळणे बंद कर’ असा दम त्याच्या आईने त्याला दिला होता, पण काहीतरी वेगळे करणार आहे, असे त्याने आईला सांगितले होते.
हरमनप्रीत हा संघाचा कप्तान! त्याने सुरुवातीच्या काळात शेती केली. महिला संघातील अनेक खेळाडूंची कथा यापेक्षा वेगळी नाही. निक्की प्रधानने तिची पहिली हॉकी स्टिक खरेदी करण्यासाठी मजूर म्हणून काम केले आहे. निशा वारशीचे वडील शिंपी काम करायचे. ती त्यांना मदत करायची. वडिलांना अर्धांगवायू झाल्यावर तिच्या आईने कारखान्यात काम केले. सलिमा टेटेचा जन्मच नक्षलवादी भागात झाला. तिलासुद्धा शेतात काम करावे लागले. या खेळाडूंचा प्रवास एखाद्या परिकथेपेक्षा कमी नाही. तो विलक्षण प्रेरणादायी आहे. पंतप्रधानांनीदेखील त्यांचे कौतुक केले. भारतीय खेळाडूंनी असेच नवनवे विक्रम रचावेत, इतिहास घडवावा आणि देशाचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रत्येक खेळाडूचे ते स्वप्न असतेच. फक्त त्यांच्या स्वप्नांना सरकारी पाठबळाचे खतपाणी गरजेचे असते.
लवलीना बोरगोहेन ही देशाची ऑलिम्पिक पदकविजेती खेळाडू! ती जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीतून नुकतीच बाहेर पडली. त्याचा दोष तिने प्रशिक्षणाच्या अल्प संधी आणि प्रशिक्षकांच्या अभावाला दिला आहे. असे खरेच घडत असेल तर त्याची सरकारने प्राधान्याने दखल घ्यायला हवी. खेळण्यासाठी किंवा सुरुवातीच्या काळात अनेक खेळाडूंना वैयक्तिक पातळीवर संघर्ष करावा लागतो. तोच संघर्ष त्यांच्या वाट्याला कायम येऊ नये, अशी त्यांची अपेक्षा असणे स्वाभाविकच! निदान या बाबतीत ‘सब घोडे बारा टक्के’ हा दृष्टिकोन उत्साह खच्ची करणारा ठरू शकेल. कुस्ती, वेटलिफ्टिंग, नेमबाजी, तिरंदाजी, बॅडमटन, हॉकी, भालाफेक अशा अनेक खेळांत जागतिक स्पर्धांमधून देशाला पदकांची अपेक्षा असते. खेळाडूदेखील त्या अपेक्षांना खरे उतरतात. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. मेजर ध्यानचंद यांनी त्याची बीजे रोवली आहेत. विश्वचषकाचा दीर्घ दुष्काळ खेळाडूंनी संपवावा, अशीच रसिकांची अपेक्षा आहे आणि खेळाडूंनीही तेच स्वप्न पाहिले असेल.





