समाजात हिंसकता वाढत असावी अशी शंका कोणालाही यावी अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढत आहे. अत्यंत क्षुल्लक कारणांवरून माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात. मारहाण करतात. प्रसंगी जीवही घेतात. वीस रुपये उसने दिले नाहीत, मोबाईल वापरायला दिला नाही, सिगारेट दिली नाही, वाहनाचा धक्का लागला याला मारहाणीची किंवा टोकाला जाऊन हत्येची करणे मानली जाऊ शकतील का? एरवी कोणीही याचे वर्णन किरकोळ गोष्टी असेच करेल. पण अशाच कारणांवरून माणसे एकमेकांना संपवण्यास मागेपुढे पाहत नाहीत. नाशिकमध्ये एक घटना नुकतीच उघडकीस आली.
आपसातील भांडणातील गैरसमजांवरून एकाने दोघांना बेदम मारहाण केली. दोघेही गंभीर जखमी झाले. माणसे वरवर शांत वाटत असली तरी आतून अस्वस्थ असावीत का? भावभावनांवर नियंत्रण ठेवणे त्यांच्यासाठी अशक्य का होत असू शकेल? मन अस्वस्थ असण्याची अनेक कारणे सांगितली जाऊ शकतील. आर्थिक अस्थिरता, वाढती स्पर्धा, वाढती बेरोजगारी, सामाजिक ताणतणाव, भेदाभेद, उसवत चाललेली कौटुंबिक नात्यांची वीण ही काही कारणे असू शकतील. पण तणाव पेलण्याची आणि त्यातून मार्ग काढण्याची माणसाची क्षमता कमी होत चालली असावी का? सामाजिक सोशिकता कमी होत चालली असावी का? परस्पर नातेसंबंधांची वीण विसविशीत होत चालली असावी का? माणसांनी मिळून समाज बनतो. मानवी वर्तनाचा समाजावर खोलवर ठसा उमटतो.
हिंसकता, आक्रमकता आणि अस्वस्थता यामुळे माणसे एकमेकांपासून दुरावतात. म्हणजेच समाजात एकतानता अनुभवास येणे दुर्मिळ बनते. त्याचेही अनुभव समाज घेतो. माणुसकी, मानवता, सहवेदना, सामाजिक बांधिलकी ही मूल्ये घसरत चालली आहेत, असे सातत्याने बोलले जाते. अर्थात, कारणे आहेत म्हणून हिंसेचे समर्थन होऊच शकत नाही. त्यावर मार्ग शोधले जायलाच हवेत. आता काळ कोणताही असो, तंत्रज्ञानाचा बोलबाला वाढणार आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता बळावणार आहे. परिणामी आर्थिक अस्थिरता वाट्याला येऊ शकेल. विविध कारणांमुळे सामाजिक सुरक्षितता बाधित होऊ शकेल.
राजकारणालाही समाजमानवर परिणाम होतो आणि अस्थिरता हा सध्याच्या राजकारणाचा जणू परवलीचा शब्द बनला असावा. या सगळ्या गदारोळात माणसाने परिस्थितीचा स्वीकार करणे कदाचित त्याची अस्वस्थता कमी करू शकेल. परिस्थिती वाटते तितकी नकारात्मक नाही, याचीही जाणीव त्यांना कदाचित होऊ शकेल. हिंसा योग्य नाहीच. तथापि तसे नुसते म्हणण्याने ती कमी होणार नाही. हिंसक आणि आक्रमक वर्तनाच्या मुळाशी जाऊन त्यामागची कारणे शोधणे आणि त्यावर बहुआयामी उपायययोजना सुचवणे ही जाणत्यांची जबाबदारी आहे.